तीव्र इंद्रियासक्ती मानवाला ध्येयापासून दूर नेते
By Admin | Updated: August 18, 2014 23:49 IST2014-08-18T23:49:04+5:302014-08-18T23:49:04+5:30
काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक

तीव्र इंद्रियासक्ती मानवाला ध्येयापासून दूर नेते
उमरखेड : काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मानवाचे शत्रू आहे. काम हा विषयासक्ती वाढवून मानवाला भलतीकडेच घेऊन जातो. तेव्हा यापासून मानवाने दूर राहिले पाहिजे, असे प्रतिपादन तुलसी-रामायणाच्या अभ्यासक आणि राम कथाकार सुश्री आशाश्री दाणी यांनी येथे केले.
हनुमान मंदिर संस्थान आणि रामभक्त मंडळींच्यावतीने आयोजित श्रीराम कथा पर्वातील प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.
श्रावण मास व पर्यावरण संतुलनासाठी आयोजित करण्यात आलेले हे कथापर्व २३ आॅगस्टपर्यंत चालणार आहे. आपल्या अभ्यासपूर्ण आणि सुश्राव्य वाणीतून आशाश्रींनी श्रीराम कथा भाविकांना सांगितली.
मानवाचे शरीर हाडामांसाचे एक गाठोडे आहे.
तीव्र इंद्रियासक्ती आणि भोगलालसेमुळे मानव आपल्या मूळ स्वरूपाला विसरुन प्रपंचरुपी नदीमध्ये सतत गटांगळ्या खातो त्यामुळे तो परमार्थी ऊर्जेला मुकत चालला आहे.
मानवाने सत्कर्मे आचरली आणि भोगलालसेपासून इंद्रियांना आवर घातली तर नराचा नारायण होतो.सुख दु:खापासून मुक्ती मिळू शकते. तुलसी-रामायणाच्या कथेचा हाच उद्देश आहे. त्यासाठी प्रत्येकाने रामकथा आवर्जून ऐकली पाहिजे.
तुलसी-रामायणाचा जन्मच मुळी आसक्ती विरोधातून झाला आहे. पत्नीच्या प्रेमामुळे आसक्त झालेल्या तुलसीदासांना ग्लानी आली होती. अहोरात्र पत्नीचे चिंतन व तिच्या विषयीच्या तीव्र आसक्तीने सैरभैर झालेल्या तुलसीदासांना त्यांच्या पत्नीनेच दिव्य उपदेश केला आणि पारलौकिक वाटेवर चालण्यास भाग पाडले, असे त्यांनी सांगितले. रामकथा श्रवण करण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)