घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर
By Admin | Updated: January 17, 2017 01:20 IST2017-01-17T01:20:40+5:302017-01-17T01:20:40+5:30
काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली.

घसरलेली तूर पोहोचली ५२०० रूपयांवर
यवतमाळ : काही दिवसांपूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलच्या घरात असलेली तूर सोमवारी ५,२०० रूपये क्विंटल दराने विकली गेली. तुरीला अधिक दर मिळावे म्हणून मार्केटिंग फेडरेशनने खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी मागितली आहे. यामुळे दर सुधारण्याची शक्यता आहे.
गतवर्षी १० ते ११ हजार रूपये क्विंटलपर्यंत असलेली तूर हंगाम सुरू होण्यापूर्वी ३,८०० ते ४,२०० रूपये क्विंटलपर्यंत खाली आली होती. यामध्ये क्विंटलमागे ७,२०० रूपयांची घट नोंदविण्यात आली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. सोमवारी बाजारातील तुरीचे दर वधारले. ४,२०० ते ५,२०० रूपये क्विंटलपर्यंत बोली लागली. यामध्ये क्विंटलमागे एक हजाराची वाढ नोंदविली गेली. मात्र गतवर्षीच्या तुलनेत हे दर निम्मेच आहे. त्यामध्ये पाच हजार रूपयांची घट आहे. जागतिक बाजारात भारतीय तुरीची असलेली मागणी आणि निर्यातबंदीने भारतात तुरीचे दर घसरले आहेत. निर्यातबंदी उठविल्यास दर वाढतील. त्यादृष्टीने केंद्र शासनाने पावले उचलण्याची गरज आहे. परंतु अद्याप कुठल्याही हालचाली नाही.
महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ को-आॅपरेटिव मार्केटिंग फेडरेशनच्या मदतीने जिल्ह्यात सात केंद्र उघडण्यात आले आहेत. यामध्ये यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, आर्णी, पुसद, दिग्रस आणि कळंंबचा समावेश आहे. (शहर वार्ताहर)
खुल्या बाजारात बोली
तुरीचे दर आधारभूत दर खाली गेल्याने हमी केंद्र उघडण्यात आले. सध्या एकाच जागेवर खरेदीची परवानगी आहे. तुरीचे दर आधारभूत किमतीच्या वर गेले आहेत. या स्थितीत स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर मिळावे म्हणून आधारभूत केंद्रांना खुल्या बाजारात बोली लावण्याची परवानगी हवी आहे.