औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा
By Admin | Updated: September 29, 2014 00:53 IST2014-09-29T00:53:07+5:302014-09-29T00:53:07+5:30
तांत्रिक शिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक अभ्यासक्रम बंद होत आहेत.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा
निश्चल गौर - डोंगरखर्डा
तांत्रिक शिक्षण घेऊन स्वयंरोजगार सुरू करता यावा यासाठी शासनाने सुरू केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. अनेक अभ्यासक्रम बंद होत आहेत. शिवाय काही ठिकाणच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांची वाणवा आहे, तर काही ठिकाणी वेतनातही अनियमितता आहे. या समस्यांमधून आयटीआयला बाहेर काढण्यासाठी ठोस प्रयत्नाची गरज आहे.
विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम अतिशय फायद्याचा आहे. न परवडणारी शेती, कामाची टंचाई आदी कारणांमुळे हा विद्यार्थी सैरभैर आहे. हाताला काम नसल्याने व्यसनाधिनतेचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी गावाची शांतता व सुव्यवस्थाही धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवक उद्योगात गुंतून असला तर ही परिस्थिती बऱ्याच अंशी नियंत्रणात राहते. मात्र औद्योगिक शिक्षणाकडेच शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
येथून जवळच असलेल्या अंतरगाव येथील आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षणासह इतर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. याचा परिणाम शिक्षणावर होत आहे. विशेष म्हणजे, शिवणकर्तन आणि ड्रायव्हर कम मेकॅनिक हे दोन व्यवसाय शिक्षण बंद झाले आहेत. ड्रायव्हर कम मेकॅनिक हा अभ्यासक्रम शासनस्तरावरून बंद करण्यात आला आहे.
या प्रशिक्षण संस्थेत शिवणकर्तन, फिटर, लिपिक आणि प्रकल्प अधिकारी ही चार पदे रिक्त आहेत. फिटर व्यवसाय शिक्षणासाठी तासिका तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीत केवळ वीजतंत्री आणि फिटर याच विषयाचे शिक्षण दिले जाते. सहा महिन्याचा व्यवसाय शिक्षण हा अभ्यासक्रम बंद झाला आहे. हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू करावा, अशी मागणी अंतरगावचे सरपंच बाबाराव पंधरे आदींनी केली आहे.