निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 10:00 PM2018-02-17T22:00:39+5:302018-02-17T22:02:18+5:30

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे.

Debt waiver for all farmers sitting in the census | निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी

निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी

googlenewsNext
ठळक मुद्देसहकार मंत्री : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे. अनावधानाने जे शेतकरी यातून सुटले आहेत, अशा शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारावे. निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सहकार विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार, राळेगावचे आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, विशेष कार्य अधिकारी संतोष पाटील, अमरावती विभागीय सहनिबंधक राजेश दाभेराव, लेखा परिक्षण विभागाचे सहनिबंधक जे.व्ही. घुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन उपस्थित होते.
निकषात बसणारे शेतकरी पुढील टप्प्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरविता येतील, असे सांगून ना.सुभाष देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांकडून कुठल्याही परिस्थितीत ३१ जुलै २०१७ नंतरचे व्याज वसूल करायचे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून पुढचे कर्ज घेण्यास ते शेतकरी पात्र झाले पाहिजे. ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक गावात किमान एक विविध कार्यकारी संस्थेची नोंदणी करावी, ज्या विविध कार्यकारी संस्थांच्या कार्यक्षेत्रात चार ते पाच पेक्षा जास्त गावांचा समावेश आहे अशा संस्थांचे विभाजन करण्याबाबत सहायक निबंधकांनी कार्यवाही करावी, यवतमाळ जिल्ह्यात शेतमाल तारण योजनेची व्याप्ती वाढवावी, असे निर्देश सहकार मंत्र्यांनी यावेळी दिले. अवैध सावकारी हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे एक कारण आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. वैध सावकारांकडून प्रचलित व्याजदारापेक्षा वाढीव व्याज आकारणी होत असेल, तर अशा सावकारांवर कायद्यानुसार कारवाई करावी. जिल्हा उपनिबंधक यांनी जिल्ह्यातील परवानाधारक सावकारांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणीबाबत व कर्जाच्या व्याजदरात सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर करावा, अशा सूचना करण्यात आल्या. रेशीम लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करा, अशा सूचना ना.देशमुख यांनी दिल्या. यावेळी सहकारी संस्थेचे उपनिबंधक गौतम वर्धन यांनी सहकार विभागाचे आणि मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी बँकेबाबत सादरीकरण केले. बैठकीला सहायक निबंधक अर्चना माळवे, बाजार समित्यांचे सचिव, तालुक्याचे सहायक निबंधक, सहकार व पणन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

Web Title: Debt waiver for all farmers sitting in the census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.