निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर ऊहापोह
By Admin | Updated: February 10, 2016 03:13 IST2016-02-10T03:13:52+5:302016-02-10T03:13:52+5:30
बालवाडी ते विद्यापीठस्तरावरील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर येथे झालेल्या चौथ्या जिल्हा अधिवेशनात ऊहापोह करण्यात आला.

निवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांवर ऊहापोह
खैरी : बालवाडी ते विद्यापीठस्तरावरील निवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर येथे झालेल्या चौथ्या जिल्हा अधिवेशनात ऊहापोह करण्यात आला. लोक विद्यालयात झालेल्या या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार बुटे होते. दीप प्रज्वलन आणि स्वागतगीताने अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. उद्घाटन शिक्षण निरीक्षक रामभाऊ तुरणकर यांच्या हस्ते झाले.
बालवाडी ते विद्यापीठीय निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनतर्फे हे अधिवेशन घेण्यात आले. निवृत्तांना किमान मासिक वेतन ३ हजार ५०० रुपये, १ जुलै २०११ नंतर निवृत्त झालेल्यांना राज्य शासनाने लागू केलेली योजना, निवृत्ती वेतन लागू करताना कुठलाही भेदभाव ठेवला जाऊ नये, केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातही स्वतंत्र पेन्शन विभाग मंत्रालयात स्थापन व्हावा, १ जुलै १९७२ नंतर सेवेत रुजू झालेल्या अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांनाही पेन्शन, उपदानाची रक्कम १० लाख रुपये व्हावी, जुलै २०१५ ते जानेवारी २०१६ या सात महिन्याच्या सहा टक्के वाढीव महागाई भत्त्याची रक्कम मिळावी, पेन्शनर्सची शिखर संघटना महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनला मान्यता द्यावी आदी ठराव या अधिवेशनात घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र चोपणे, जिल्हाध्यक्ष प्रा. ए.एम. गोरंटीवार, जिल्हा सचिव व्ही.बी. टोंगे, टी.ए. ताटेवार, एम.जी. गाडगे, एन.बी. महाजन आदी उपस्थित होते. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. अधिवेशनासाठी पी.एस. महाजन, एन.बी. महाजन, एल.एल. गौरकार, महाजन, पी.एस. घुमे, शा.गु. सरोदे, अंबादास कुटे, एम.बी. सरोदे, के.के. निवल, भेदूरकर, खैरकार आदींनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)