विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद

By Admin | Updated: August 13, 2015 03:08 IST2015-08-13T03:08:20+5:302015-08-13T03:08:20+5:30

येथील नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषद घेऊन २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय घेतल्यावरून नगर परिषदेत वाद उफाळून आला आहे.

Debate from development work | विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद

विकास कामांच्या श्रेयावरून नगरपरिषदेत वाद

नगराध्यक्षांच्या भूमिकेवर आक्षेप : शहर विकास आघाडीची बैठक गाजली
यवतमाळ : येथील नगराध्यक्ष सुभाष राय यांनी पत्रपरिषद घेऊन २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय घेतल्यावरून नगर परिषदेत वाद उफाळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी शहर विकास आघाडीची बैठक पार पडली. त्यात या श्रेयासोबतच अन्य मुद्यांवरही चर्चा गाजली.
नगर परिषदेचे उपाध्यक्ष तथा शहर विकास आघाडीचे गटनेते मनीष दुबे यांच्या कक्षात ही बैठक झाली. यावेळी काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, बसपाचे काही सदस्य उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीबाबत अनेक सदस्यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. नुकतेच नगराध्यक्षांनी २५ कोटींच्या विकास कामांचे श्रेय स्वत:कडे घेतले. मग आमचे काहीच अस्तित्व नाही का असा प्रश्न काही सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला.
नगर परिषदेचे प्रशासन कुणालाही विश्वासात न घेता परस्परच निर्णय घेत असल्याबाबत आक्षेप नोंदविला गेला. शौचालयांना जाळ्या बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. मात्र त्याची माहिती खुद्द संबंधित सभापतींनाही दिली गेली नाही. नगर परिषदेच्या विषय पत्रिकेमध्ये नगरसेवकांनी वार्डावार्डातील सूचविलेली कामे समाविष्ट केली जात नाही. एक नाली आणि एक रस्ता एवढ्याच पुरते नगर सेवकांना मर्यादित ठेवले जाते, अशी भावना काही सदस्यांनी बोलून दाखविली.
मुख्याधिकारी रवींद्र पांढरे ऐन कामाच्या वेळी हजर राहत नाही, अशाही तक्रारी होत्या. या बैठकीला शहर विकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. (कार्यालय प्रतिनिधी)
यवतमाळ नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी १३ आॅगस्ट रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीच्या सभेला महत्व दिले जात आहे. गुरुवारची सर्वसाधारण सभाही गाजविण्याचे सूतोवाच शहर विकास आघाडीच्या बैठकीत काही सदस्यांनी केले. व्हीडीओ चित्रीकरणात ही सभा होणार आहे. मागील सभेच्या इत्तीवृत्ताची इत्यंभूत अंमलबजावणी झाली की नाही, जुने ठराव कार्यान्वित केले गेले की नाही याची आधी शहानिशा केली जाईल, त्यानंतरच पुढील सभा चालवू दिली जाईल, अशी भूमिका बैठकीत घेतली गेली.
विधीमंडळ महिला हक्क समिती धडकणार
राज्य विधिमंडळाची महिला हक्क समिती जिल्ह्यात येणार आहे. ही समिती नगर परिषदेलाही भेट देईल. मात्र या नगर परिषदेत महिला सदस्यांवरच विविध स्तरावर अन्याय होत असल्याची भावना पुढे आली. नगर परिषदेचे महिलांसाठी असलेले प्रसाधनगृह कुलूप बंद राहते, त्याच्या चाबीसाठी महिला सदस्यांना फिरावे लागते, असा मुद्दाही शहर विकास आघाडीच्या बैठकीत पुढे आला. यासह अन्य मुद्दे विधीमंडळ महिला हक्क समितीपुढे गाजविण्याची तयारी करण्यात आली आहे.

Web Title: Debate from development work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.