‘मौत का कुंआ’ची पिंपळगावात दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST2019-09-14T06:00:00+5:302019-09-14T06:00:06+5:30
या परिसरात बहुतांश नागरिक नव्यानेच राहण्यासाठी आलेले असल्यामुळे या खड्ड्याविरोधात फारसे कोणी बोलायला तयार नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना हा खड्डा पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

‘मौत का कुंआ’ची पिंपळगावात दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरालगत झालेल्या नवीन वसाहती म्हणजे समस्यांचे माहेरघर बनले आहे. रस्ते, सांडपाणी या समस्यांसोबतच आता खड्ड्यांनी नागरिकांना वैताग आणला आहे. पिंपळगाव परिसरात तर १५ फुट खड्ड्याने ‘मौत का कुंआ’चे रूप धारण केले असून नागरिक जीवघेण्या संकटाला तोंड देत आहेत.
काही दिवसांपूर्वीच यवतमाळ नगरपालिकेत विलीन झालेल्या पिंपळगाव परिसरात साई बालाजी पार्क नावाची वसाहत वसली आहे. या ठिकाणी ऐन मुख्य मार्गावरच तब्बल १५ फूट खोल खड्डा पडला आहे. अडीच महिन्यांपासून हा खड्डा जसाच्या तसा कायम आहे.
विशेष म्हणजे या परिसरात बहुतांश नागरिक नव्यानेच राहण्यासाठी आलेले असल्यामुळे या खड्ड्याविरोधात फारसे कोणी बोलायला तयार नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी भूमिगत गटारीसाठी खोदकाम करताना हा खड्डा पडला असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. हा खड्डा बुजविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
डुकरं, कुत्रे गडप.. आता माणसं बाकी
अडीच महिन्यांपूर्वी खोदलेला खड्डा प्रशासनाने अद्यापही बुजविला नाही. या खड्ड्यात अनेक डुकरं, कुत्रे पडून ठार झाले. आता माणसं पडून मरण्याची प्रशासन वाट पाहात आहे का, असा संतप्त सवाल या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.