दोन महिलांचा खून करून प्रेत दडपले
By Admin | Updated: August 12, 2014 00:09 IST2014-08-12T00:09:44+5:302014-08-12T00:09:44+5:30
दोन महिलांचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने त्यांचे मृतदेह दडपले गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. यातील एक घटना वणी तर दुसरी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

दोन महिलांचा खून करून प्रेत दडपले
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न : एकीचा मृतदेह दिवाणमध्ये तर दुसरीचा जमिनीत पुरला
वणी/कळंब : दोन महिलांचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्याच्यादृष्टीने त्यांचे मृतदेह दडपले गेल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या. यातील एक घटना वणी तर दुसरी कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
कल्पना शिवकुमार जोनलवार (५०) रा. साईनगर वणी असे गळा दाबून खून करण्यात आलेल्या विधवा मृत महिलेचे नाव आहे. तर कळंब तालुक्याच्या कान्होली येथील सुमन महादेव राऊत (५७) या तीन दिवसांपासून बेपत्ता महिलेचा मृतदेह जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनांनी जिल्ह्यासह पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे. दोनही घटनांमागील नेमके कारण स्पष्ट झाले नाही. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
वणी येथील कल्पना शिवकुमार जोनलवार या महिलेच्या खुनाची घटना रात्री २ वाजता उघड झाली. या प्रकरणात मारेकरी जवळचाच कुणी तरी असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वणी पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०२, २०१ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. सूत्रानुसार, रविवारी रक्षाबंधनासाठी भाऊ अनिल रेगुंडवार कोरपना येथून वणीत आले. विशेष म्हणजे त्यांच्या तीन बहिणी वणीत राहातात. प्रथम सविता चंद्रशेखर गंगशेट्टीवार या बहिणीकडे राखी बांधली. त्यानंतर दुपारी वर्षा रामा पोदुतवार या दुसऱ्या बहिणीकडे गेले. शेवटी मोठी बहिण कल्पना जोनलवार यांच्या घरी गेले तेव्हा मुख्य प्रवेशवदार बंद दिसले. दरवाजे मात्र आतून बंद होते. त्यांनी शेजारी विचारपूस केली. मात्र पत्ता लागला नाही. मोबाईलही स्वीच आॅफ येत होता. कल्पना कुठेच दिसत नसल्याने सर्व नातेवाईक सविता गंगशेट्टीवार यांच्या घरी एकत्र आले. रात्री १० वाजेपर्यंत शोधाशोध केली. शेवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान कल्पनाच्या चंद्रपूर येथील प्रिया व अहेरी येथील प्रियंका या दोन विवाहित मुली सोमवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास वणीत आल्या. या दोघी झोपण्यासाठी आईच्या घरी गेल्या. वाहन चालक त्यांच्यासोबत होता. त्याने बेडरुममध्ये जाऊन दिवाणवरील गादी उचलली आणि दिवाणमधून एक हात बाहेर आलेला दिसला. नातेवाईकांनी बघितले असता दिवाणात कल्पनाचा मृतदेहच आढळला.
याबाबत लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून मृतदह बाहेर काढला आणि पंचनामा सुरू केला.
दरम्यान, कल्पना यांचा साई हा मुलगा मावसभाऊ श्रेयस गंगशेट्टीवार याच्यासोबतच दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील गडवारा येथील श्रेयसच्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेला होता.
मृतदेह अर्धवट पुरला
शेतात गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून केल्यानंतर तिचा मृतदेह शेतातच अर्धवट स्थितीत पुरण्यात आला. ही घटना तालुक्यातील कान्होली येथे घडली. सुमन महादेव राऊत (५७) असे मृत महिलेचे नाव आहे. कान्होली शिवारातीलच मक्त्याने केलेल्या शेतात ८ आॅगस्टला सुमन गेली होती. त्यानंतर ती घरी परतलीच नाही. या घटनेची माहिती कळंब पोलिसात देण्यात आली होती. दरम्यान, १० आॅगस्टला दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शेतातच तिचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच कळंब ठाण्याचे फौजदार वंजारी पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केली असता गळ्याला आवळल्याच्या खुना दिसून आल्या. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविला. त्यानंतर अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मारेकऱ्यांना हुडकून काढण्यासाठी गोपनीय माहिती काढली. त्यामध्ये काही संशयास्पद बाबी पुढे आल्या आहे. त्या दिशेने तपास केला जात आहे. (प्रतिनिधी)