पिता-पुत्रांना वाचविताना शेजारील तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: February 22, 2015 02:06 IST2015-02-22T02:06:42+5:302015-02-22T02:06:42+5:30
पती-पत्नीचे क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात पतीने परिसरातील विहिरीत उडी घेतली. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी दोन मुलांनी विहिरीत उड्या घेतल्या.

पिता-पुत्रांना वाचविताना शेजारील तरुणाचा मृत्यू
यवतमाळ : पती-पत्नीचे क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात पतीने परिसरातील विहिरीत उडी घेतली. हे पाहून त्याला वाचविण्यासाठी दोन मुलांनी विहिरीत उड्या घेतल्या. त्यातील एका मुलाला पोहता येत नसल्याचे माहिती असल्याने शेजाऱ्याने त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. त्यामध्ये ते तीन पिता-पुत्र सुखरूप बचावले. मात्र शेजारच्याचा गाळात फसून मृत्यू झाला. समाजमन सुन्न करणारी ही घटना येथील दारव्हा मार्गावरील भोयर शिवारात शनिवारी दुपारी घडली.
लखन रमेश कांबळे (२७) रा. विठाळा, ता. दिग्रस असे मृताचे नाव आहे. भोयर शिवारात देवीदास खंदरकर रा. लोहारा यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीवर बाहेरगावचे सुमारे ३५ मजूर कुटुंबासह कामाला आहेत. त्याच कामावर असलेल्या शेख मुनाफ शेख हुसेन (५०) रा. शेंदुरजना, जि. वाशिम याचे पत्नी सायरा शेख मुनाफ हिच्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात त्याने परिसरातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब त्याची दोन मुले शेख शहारूख आणि शेख शकीर यांच्या लक्षात आली. त्यांनी वडिलांना वाचविण्यासाठी विहिरीत उड्या घेतल्या. शहारूख आणि शकीर यांच्यापैकी एकाला पोहता येत नसल्याचे माहिती असलेला शेजारी तरुण लखन कांबळे याने त्याला वाचविण्यासाठी विहिरीत उडी घेतली. यावेळी शेख मुनाफ आणि त्याची दोन मुले विहिरीतून सुखरूप बाहेर पडली. मात्र लखन दिसत नव्हता. स्थानिक नागरिकांनी उड्या घेऊन शोध घेतला तेव्हा विहिरीतील गाळात फसून त्याचा मृत्यू झाला होता. देवीदास खंदरकर यांनी घटनेची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)