अर्जुना येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

By Admin | Updated: May 19, 2016 02:01 IST2016-05-19T02:01:53+5:302016-05-19T02:01:53+5:30

पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे

The death of the girl in the well in Arjuna | अर्जुना येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

अर्जुना येथे विहिरीत पडून तरुणीचा मृत्यू

पाणी बळी : महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई
हिवरी : पाणीटंचाईमुळे कपडे धुण्यासाठी विहिरीवर गेलेल्या एका तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अर्जुना येथे बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. गावात गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई असून या पाणीटंचाईनेच तरुणीचा बळी घेतल्याचा आरोप गावकरी करीत होते.
रत्नकला गणेश तितरे (१६) रा. अर्जुना असे मृत तरुणीचे नाव आहे. अर्जुना येथे गत काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील एका विहिरीवरून पाणी आणावे लागते. याच विहिरीचा उपयोग कपडे धुण्यासाठीही केला जातो. बुधवारी दुपारी रत्नकला आपल्या एका मैत्रिणीसह या शेतातील विहिरीवर गेली होती. कपडे धुण्यासाठी पाणी काढत असताना तिचा तोल गेला आणि २५ फूट खोल विहिरीत पडली. यानंतर तिची मैत्रीण धावत गावात आली आणि घडलेला प्रकार गावकऱ्यांना सांगितला. गावकऱ्यांनी शेतातील विहिरीकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक भगत, राजकुमार आडे यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने प्रेत बाहेर काढले. (वार्ताहर)

गावकऱ्यांचा आरोप
गावात भीषण पाणीटंचाई असतानाही ग्रामसेवक पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांना शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागतो. विहीर अधिग्रहण करण्यातही ग्रामसेवकाने कुचराई केल्याने आजचा हा प्रकार घडल्याचा आरोप गावकरी करीत होते. ज्या विहिरीला पाणी नाही ती विहीर अधिग्रहित केल्याचे घटनास्थळावर गावकरी सांगत होते.

Web Title: The death of the girl in the well in Arjuna