चौघांचा मृत्यू : पत्नी, शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
By Admin | Updated: September 10, 2016 00:45 IST2016-09-10T00:45:10+5:302016-09-10T00:45:10+5:30
तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून आत्महत्या करणाऱ्या पांडुरंगच्या पत्नीसह शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला

चौघांचा मृत्यू : पत्नी, शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
फाळेगावचे प्रकरण : मृत पांडुरंगवरही खुनाचा गुन्हा दाखल
बाभूळगाव : तीन चिमुकल्यांना विहिरीत लोटून आत्महत्या करणाऱ्या पांडुरंगच्या पत्नीसह शेतमालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांना बाभूळगाव पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान मृत पांडुरंग विरुद्धही तीन मुलांना विहिरीत लोटून मारल्याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव येथील पांडुरंग श्रीराम कोडापे याने बुधवारी आपल्या तीन मुलांना विहिरीत लोटून स्वत:ही आत्महत्या केली होती. या चौघांच्या मृत्यूला जबाबदार धरत पांडुरंगची पत्नी आणि ज्या विहिरीत आत्महत्या केली त्या शेताचे मालक स्वप्नील दिलीप बानुबाकुडे (३२) याच्याविरुद्ध पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी या दोघांना बाभूळगाव पोलिसांनी अटक केली. दरम्यान तीन मुलांचा जीव घेऊन आत्महत्या करणाऱ्या पांडुरंग कोडापे याच्याविरुद्धही बाभूळगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हनुमंतराव गायकवाड करीत आहे. (प्रतिनिधी)
वेगळ्या कारणाचा शोध
गरिबी आणि कर्जबाजारीपणा यातून पांडुरंग श्रीराम कोडापे याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्या दृष्टीने पोलीस तपासही करीत आहे. मात्र या आत्महत्येत आणखी वेगळे कोणते कारण आहे याचा शोधही पोलीस घेत आहे. एका जन्मदात्याने तीन चिमुकल्यांना विहिरीत फेकून आत्महत्या केल्याने या मागे तेवढेच मोठे कारण असावे, असा संशय पोलिसांसह गावकऱ्यांनाही आहे.