घाटंजीत प्रवासी वाहनांमध्ये जीवघेणी स्पर्धा
By Admin | Updated: March 16, 2015 01:54 IST2015-03-16T01:54:24+5:302015-03-16T01:54:24+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी वाहनांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जागा मिळेल तिथे प्रवासी बसवून एकापुढे एक सोसाट्याने वाहन चालवत आहेत.

घाटंजीत प्रवासी वाहनांमध्ये जीवघेणी स्पर्धा
घाटंजी : तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवासी वाहनांमध्ये जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जागा मिळेल तिथे प्रवासी बसवून एकापुढे एक सोसाट्याने वाहन चालवत आहेत. यासह अनेक अवैध व्यवसायाला स्थानिक पोलिसांचे पाठबळ असल्याचे दिसून येते. आतापर्यंत तालुक्यात एकाही अवैध धंद्यावर कठोर कारवाई झाली नाही.
ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून खासगी प्रवासी वाहनांकडे पाहण्यात येते. मिनीडोअर, अॅपे, जीप यासारख्या वाहनांमधूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागत आहेत. पोलिसांशी या व्यवसायिकांचे असलेले आर्थिक संबंध सर्वश्रुत आहे. किमान जीवघेण्या प्रकारे ही वाहतूक केली जाऊ नये इतकी तसदी तरी स्थानिक पोलिसांनी घ्यावी अशी अपेक्षा हतबल ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
याशिवाय तालुक्यात लाखो रुपयांचे कोंबड बाजार पारवा परिसरातील झटाळा शिवारातील मोठा देव जंगलात भरतो. येथे बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी कोंबड बाजार चालतो. या बाजारात तीन पत्ते जुगार, झेंडीमुंडी खेळण्यात येते. यातून लाखो रुपयांची लूट होते. हा कोंबड बाजार चालविण्यामागे अनेक मोठ्या हस्ती असल्याने तक्रारी होऊनही कारवाई केली जात नाही. या कोंबड बाजाराची तक्रार थेट गृहराज्यमंत्र्यांकडे करण्यात आली. मात्र त्यानंतरही हा कोंबड बाजारा राजरोसपणे सुरूच आहे. याप्रमाणेच असंख्य अवैधधंदे घाटंजीसह विविध ठिकाणी सुरू आहेत. (प्रतिनिधी)