जिल्हा बँकेच्या कंत्राटी-अनुकंपा भरतीत ‘डिलिंग’
By Admin | Updated: August 26, 2015 02:35 IST2015-08-26T02:35:37+5:302015-08-26T02:35:37+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कंत्राटी लिपिक व अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिलिंग’ झाल्याची माहिती आहे.

जिल्हा बँकेच्या कंत्राटी-अनुकंपा भरतीत ‘डिलिंग’
चपराशी सात लाख, लिपीक पंधरा लाख : कंत्राटींची मुख्यालयातच गर्दी, अनेक शाखा चक्क दोेन कर्मचाऱ्यांवर
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कंत्राटी लिपिक व अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिलिंग’ झाल्याची माहिती आहे. यातील अनेक कंत्राटींना आगामी नोकर भरतीमध्ये स्थायी आॅर्डर देण्याची हमी दिली गेली, हे विशेष.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कंत्राटी पदाची भरती घेतली जात आहे. लिपिकाला नऊ हजार रुपये निश्चित वेतन देऊन ११ महिन्यांसाठी नियुक्ती दिली जाते. ही भरती कंत्राटी स्वरूपाची असली तरी भविष्यात यातूनच बँकेच्या स्थायी पदावर दावा करता येऊ शकतो, असा विचार करून अनेकजण या कंत्राटी पदासाठी मोठ्या प्रमाणावर रकमा देत असल्याचे सांगितले जाते. नियमित कंत्राटी पदासाठी २५ ते ३० हजार रुपये घेतले जातात. बँकेने कंत्राटीस्तरावर १६५ लिपिकांची भरती केली. त्यांना आदेशही जारी केले गेले आहे. गेल्या वर्षीच्या भरतीतील रक्कम न मोजणाऱ्या काहींना पुन्हा नियुक्ती दिली गेली नाही, तर काहींना बँकेच्या आगामी भरतीत स्थायी पद मिळविण्यासाठी करावयाच्या आर्थिक तडजोडीला वेळ मिळावा म्हणून कंत्राटी भरतीतून मुक्त करण्यात आले. १६५ कंत्राटी कर्मचाऱ्यांमधील बहुतांश जणांना त्यांच्या सोयीने नियुक्त्या दिल्या गेल्या. यातील अनेकांची नियुक्ती जिल्हा बँकेच्या यवतमाळ मुख्यालयी करण्यात आली. याउलट खरोखर आवश्यकता असलेल्या शाखांना वंचित ठेवले गेले. अनेक शाखांमध्ये अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर कामकाज चालवावे लागत आहे. काही ठिकाणचे कर्मचारी काढून घेऊन त्यांना सोयीने नियुक्त्या दिल्या गेल्या आहेत. जिल्हा बँकेच्या ३५० कर्मचाऱ्यांच्या नोकर भरतीचा प्रस्ताव दोन वर्षांपासून नाबार्डकडे पडून आहे. मात्र बँकेवर तीन वर्षांपासून प्रभारी संचालक मंडळ असल्याने नाबार्डने या भरतीला परवानगी दिलेली नाही. नेमक्या याच ३५० जागांचे गाजर दाखवून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून पैसा उकळला गेला आहे. अनेकांनी तर स्थायी नियुक्तीसाठी बोलणीही करून ठेवली असून काहींनी अॅडव्हान्स दिल्याचे सांगितले जात आहे.
सर्वाधिक ‘डिलिंग’ झाली ती अनुकंपा भरतीमध्ये. त्यात एकूण १८ जागा भरल्या गेल्या. यातील १५ लिपिकाच्या तर तीन शिपायांच्या आहे. शिपायाच्या जागेसाठी सहा ते सात लाखांचा दर चालल्याची चर्चा आहे. ते पाहता लिपिकांचा दर किती वर पोहोचला असेल याची कल्पना येते. जिल्हा बँकेच्या उपविधीमध्ये अनुकंपा भरती करण्यात येऊ नये, असे नमूद आहे. मात्र संचालक मंडळाने ठराव घेऊन शासनाने परवानगी दिल्यास ही भरती करता येते. नेमका याच तरतुदीचा आधार घेऊन ही १८ जागांची अनुकंपा भरती केली गेली. त्यात बहुतांश जागांसाठी ‘डिलिंग’ झाल्याची चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक, एकजुटीचा निर्धार
२०० कोटींची उलाढाल असलेल्या जिल्हा बँक कर्मचारी पतसंस्थेत अध्यक्ष पदावरून फूट पाडण्याचा, दोन पॅनलला एकत्र येऊ न देण्याचा संचालकांचा मनसुबा असल्याचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी, २३ आॅगस्ट रोजी बँकेच्या कर्मचारी संघटनांनी तातडीने बैठक बोलावून कोणत्याही परिस्थितीत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बँक कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस न देण्याचा ठराव गतवर्षी संचालक मंडळाने घेतला. मात्र यावर्षी या बोनससाठी एकजुटीने लढा उभारण्याचे ठरविण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या लाभातील ‘मार्जीन’वरही यावेळी खासगीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते.
संचालक मंडळाची आज बैठक
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची २६ आॅगस्ट बुधवार रोजी बैठक होत आहे. विषय पत्रिकेवर ‘रूटिन’ विषय असले तरी कंत्राटी भरतीतील खासगी बाबींवरच या बैठकीत अधिक चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.