पुरलेले प्रेत बाहेर काढले
By Admin | Updated: January 24, 2015 02:00 IST2015-01-24T02:00:07+5:302015-01-24T02:00:07+5:30
मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खूनच झाल्याची तक्रार महागाव पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी पुरलेले प्रेत शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आले.

पुरलेले प्रेत बाहेर काढले
महागाव/बिजोरा : मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खूनच झाल्याची तक्रार महागाव पोलिसात दिल्यानंतर शुक्रवारी पुरलेले प्रेत शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आले. पोलिसांच्या बंदोबस्तात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, पित्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. ही घटना महागाव तालुक्यातील बेलदरी येथे घडली.
बेलदरी येथील वैभव मुरलीधर जाधव (१६) याचा १६ जानेवारी रोजी अपघाती मृत्यू झाला होता. दरम्यान २१ जानेवारी रोजी वैभवचे वडील मुरलीधर जाधव यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलाचा अपघाती मृत्यू नसून त्याचा खून केल्याचे या तक्रारीत म्हटले होते. तसेच प्रेताचे शवविच्छेदन करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावरून पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन शुक्रवारी शवविच्छेदनासाठी पुरलेले प्रेत बाहेर काढले. तालुका वैद्यकीय अधिकारी जे.एम. पठाण यांनी शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालानुसार वैभवच्या डोक्याच्या डाव्या बाजूला मार लागल्याने मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. पुरलेले प्रेत बाहेर काढणार असल्याने बेलदरी येथे परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
दुपारी २ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी प्रेत बाहेर काढले. त्यावेळी वैभवचे वडील आणि भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते. शवविच्छेदन करतेवेळी महागावचे तहसीलदार विकास माने, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, ठाणेदार पी.बी. शेळके, डॉ.जी.जी. खारोडे आदी उपस्थित होते. दरम्यान वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित मधुकर गुलाब जाधव याला ताब्यात घेतले. (वार्ताहर)