प्रेतासह गावकरी ठाण्यात
By Admin | Updated: April 27, 2015 01:59 IST2015-04-27T01:59:08+5:302015-04-27T01:59:08+5:30
तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नेर तालुक्यातील लिंगा येथील गावकरी प्रेतासह लाडखेड पोलीस ठाण्यात धडकले.

प्रेतासह गावकरी ठाण्यात
सोनखास : तरुणाच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नेर तालुक्यातील लिंगा येथील गावकरी प्रेतासह लाडखेड पोलीस ठाण्यात धडकले. गावातील भरचौकात मारहाण झाल्याने अपमानित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.
विशाल विजय जाधव (२२) रा. लिंगा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास गावातील चौकात दोन महिलांसह सात जणांनी त्याला बेदम मारहाण केली होती. यामुळे अपमानित झालेल्या विशालने गावानजीक असलेल्या एका शेतातील झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे गावात एकच खळबळ उडाली. विशालला मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली. दरम्यान गावकरी विशालचे प्रेत घेऊन चक्क लाडखेड पोलीस ठाण्यात पोहोचले. सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लावून धरली. तब्बल तीन तास गावकऱ्यांनी ठिय्या दिला. अखेर पोलिसांनी गावातील सचिन सुधाकर बोरकर, अंकुश चक्रधर बोरकर, प्रवीण विष्णू लांडे, नितीन विष्णू लांडे, विष्णू नथ्थू लांडे आणि दोन महिलांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र गावकरी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. पोलिसांनी शवविच्छेदन अहवालावरून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. लाडखेडचे ठाणेदार सुभाष क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक यशवंत रामगडे, जमादार संतोष पटले, मनोज चौधरी यांनी लिंगा गावाला भेट देऊन पाहणी केली. तूर्तास कुणालाही अटक केली नव्हती. (वार्ताहर)