दिवटे समर्थकांचा पोलिसांवर हल्ला
By Admin | Updated: July 30, 2015 02:11 IST2015-07-30T02:11:29+5:302015-07-30T02:11:29+5:30
पोलीस दप्तरी फरार असलेल्या प्रवीण दिवटेच्या शोधार्थ गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला.

दिवटे समर्थकांचा पोलिसांवर हल्ला
यवतमाळ : पोलीस दप्तरी फरार असलेल्या प्रवीण दिवटेच्या शोधार्थ गेलेल्या पोलीस पथकावर त्याच्या समर्थकांनी हल्ला केला.
या प्रकरणी महिला सहायक पोलीस निरीक्षकाच्या तक्रारीवरून भादंवि ३५३, १८६, ५०४, ५०६ (ब), तसेच ४/२५ आर्म्स अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हरीश दिवटे, उषा दिवटे, सृष्टी दिवटे, श्वेता दिवटे व अन्य तीन जणांना आरोपी बनविण्यात आले. हरीशला बुधवारी दुपारी अटक करण्यात आली. पोलिसांचे पथक मंगळवारी रात्री ११.३० वाजता बांगरनगरात प्रवीण दिवटेच्या घरी सर्च करण्यासाठी गेले होते. मात्र तेथे या सर्चवर कुटुंबियांनी आक्षेप घेतला. वारंवार आमचेच घर दिसते का असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी दिवटे समर्थकांनी पाठलाग केल्याने पोलिसांना काढता पाय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. पोलिसांनी मात्र नाईट गस्तीदरम्यान या आरोपींनी शासकीय कामात हस्तक्षेप, धक्काबुक्की व शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडे शस्त्रे सापडल्याचीही नोंद आहे.
विशेष असे दोन आठवड्यांपूर्वी गुन्हेगारी वर्तुळातील एका इंग्रजीवर प्रभूत्व असलेल्या सदस्याने पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली होती. तुझ्या वरिष्ठाला संपवून टाकू असा दम धामणगाव रोडवर पॉलिटेक्नीक कॉलेजसमोर भरला होता, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)