दिवटेच्या मारेकऱ्यांचा येळाबारा जंगलात मुक्काम

By Admin | Updated: September 8, 2016 01:09 IST2016-09-08T01:09:40+5:302016-09-08T01:09:40+5:30

कुख्यात प्रवीण दिवटेची हत्या केल्यानंतर काही आरोपींनी येळाबारा नजीकच्या जंगलातील मंदिर परिसरात त्या रात्री मुक्काम ठोकला होता.

Day of the Dead | दिवटेच्या मारेकऱ्यांचा येळाबारा जंगलात मुक्काम

दिवटेच्या मारेकऱ्यांचा येळाबारा जंगलात मुक्काम

दुचाकीने पसार : जखमी शुभम, रोहितने पांढरकवड्यात घेतला आश्रय
यवतमाळ : कुख्यात प्रवीण दिवटेची हत्या केल्यानंतर काही आरोपींनी येळाबारा नजीकच्या जंगलातील मंदिर परिसरात त्या रात्री मुक्काम ठोकला होता. तर जखमी आरोपी व त्याच्या सहकाऱ्यांनी पांढरकवड्यात आश्रय घेतला. हत्याकांडानंतर नियोजनबद्ध पद्धतीने दुचाकीने पसार झाल्याचे आता पोलीस तपासात पुढे आले आहे. दिवटे हत्याकांडाची कडी उकलण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.
माजी नगरसेवक कुख्यात प्रवीण दिवटे याची २७ आॅगस्ट रोजी सकाळीच ८.३० च्या सुमारास वाघापूर रोड परिसरातील त्याच्या घरात घुसून हत्या करण्यात आली. आतापर्यंत विधीसंघर्षग्रस्त बालकासह नऊ जणांना अटक केली आहे. प्रत्यक्ष हत्याकांडात सहभागी असलेल्या चार आरोपींचा शोध अजूनही पोलीस घेत आहेत. या प्रकरणातील यानंतर आरोपी कशा पद्धतीने पसार झाले याचा घटनाक्रमच आता पुढे आला आहे. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी हा घटनाक्रम पोलिसांपुढे कथन केला. या घटनेतील विशाल दुबे, आनंद गुप्ता, प्रदीप पाली हे मारेकरी भोसा रोड मार्गे घाटंजीकडे पसार झाले. जाताना आनंद गुप्ता याने भोसा परिसरात त्याचे शस्त्र पानठेल्यामागे लपून ठेवले, तर मोनू बाजड व इतर दोन आरोपी गोधणी मार्गे घाटंजीकडे पळाले. जाताना मोनूने आकाशवाणी परिसरातील झुडपात हत्यार लपविले. रोहित जाधव व शुभम जयस्वाल हेसुद्धा भोसा मार्गेच येळाबारा शिवारातील जंगलात पोहोचले. जाताना पांढरी येथे महसूलचे कर्मचारी रेतीच्या ट्रकवर कारवाई करताना दिसले. आरोपींना पोलिसांचा संशय आल्याने विशालच्या गाडीवर असलेल्या चौघापैकी एक रोहितच्या गाडीवर बसला. तिबलसीट तीन वाहनांनी हे मारेकरी पुढे निघाले. त्यांनी स्कुटी, अ‍ॅव्हीएटर आणि स्प्लेंडर या दुचाकी वाहनांचा वापर केला.
येळाबारा जंगलातील एका मंदिराला लागून जंगलात यांनी मुक्काम केला. विशाल दुबे याने जवळ असलेली रोख ४० हजाराची समसमान विभागणी केल्यानंतर तेथून कोणी पुढे जायचे याचे नियोजन केले. रोहित जाधव आणि जखमी शुभम पांढरकवड्याला पोहोचला. तेथे शुभमच्या नातेवाईकाला बोलावून त्यांच्या ताब्यात देण्यात आले, तर रोहित पांढरकवड्यावरून नागपूरकडे रवाना झाला. जखमी शुभमला तेलंगाणातील मंचिरीयल येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोनू बाजड आणि त्याचे दोन सहकारी अकोलाबाजारकडे परत आले. मोनू बाजडने आर्णी मार्गे दिग्रस, पुसद आणि नंतर अमरावती, असा प्रवास केला.
विशाल दुबे, आनंद गुप्ता व आणखी एक सहकारी यांनी येळाबारा येथील जंगलातच रात्रभर मुक्काम केला. त्यानंतर हैदराबादकडे पलायन केले. हा घटनाक्रम पोलिसांना आरोपींनी दिलेल्या कबुलीतून पुढे आला आहे. आतापर्यंत आरोपींकडून दोन पिस्तुल, दोन कोयते (आंध्र बनावटीचे), दोन चाकू जप्त करण्यात आले आहे. आणखी याच गुन्ह्यात वापरलेली एक पिस्तुल व इतर काही शस्त्रे जप्तीची कारवाई करणे बाकी आहे. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल फोन याचाही शोध पोलीस घेत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Day of the Dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.