दारव्हा क्रीडांगणाची होणार सुधारणा
By Admin | Updated: October 5, 2016 00:46 IST2016-10-05T00:46:02+5:302016-10-05T00:46:02+5:30
येथे खेळण्याकरिता उपलब्ध असणाऱ्या शिवाजी स्टेडियम बॅडमिंटन हॉल यासारख्या दुरावस्थेतील क्रीडांगणाची सुधारणा केल्या जाणार आहे.

दारव्हा क्रीडांगणाची होणार सुधारणा
पालकमंत्र्यांकडून दखल : खेळाडूंना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना
मुकेश इंगोले दारव्हा
याबाबत नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
गेल्या अनेक दिवसांपासूनच्या तक्रारीची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली. खेळाडूंना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे लवकरच सुधारणेच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. दारव्हा येथे नव्याने क्रीडा संकुल उभारण्यात आले नाही. त्यामुळे शिवाजी स्टेडियम बचत भवनमधील बॅडमिंटन कोर्ट यासारख्या पूर्वीच्या ठिकाणी खेळाडूंना सराव करावा लागतो. सध्या अस्तित्वात असलेल्या या क्रीडांगणावर लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. परंतु तरीसुद्धा या ठिकाणांची खस्ता हालत आहे. कारण नियमित देखभाल दुरुस्ती केल्या जात नाही. काही वर्षापूर्वी इथे प्रेक्षक गॅलरी, स्टेज दुरुस्ती, प्रसाधनगृह, संरक्षक भिंत आदींसह मैदानाची डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली. परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थी झाली आहे. स्टेजवरील टाईल्स फुटल्या, कार्यालयासाठी बांधण्यात आलेल्या खोलीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, प्रसाधनगृहामध्ये घाण पसरली आहे. मैदानाचीसुद्धा दुरावस्था आहे.
त्याचबरोबर बॅडमिंटन हॉलची काहीशी अशीच अवस्था आहे. कोर्टच्या पाट्या उखडल्या गेल्या, बाजूच्या टाईल्स फुटल्या. या ठिकाणी व्यवस्थित विजेची व्यवस्था नाही. नियमित साफसफाई होत नाही. या कारणांमुळे खेळाडूंना असुविधेचा सामना करावा लागत असल्याने क्रीडांगणाविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीपूर्वी जिल्हा क्रीडा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप गिरी यांनी शिवाजी स्टेडियम व बॅडमिंटन कोर्टची पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत शिवाजी स्टेडियमचे ग्राऊंड लेवलिंग, पुरुष प्रसाधनगृहाची दुरुस्ती, महिला प्रसाधनगृहाचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्टेजची दुरुस्ती करण्यात येईल, तर बॅडमिंटन कोर्टवर मॅटची व्यवस्था या इनडोअर गेममध्ये खेळाडूंना पुरेसा प्रकाश मिळावा याकरिता लाईटची व्यवस्था, हॉलमध्ये नवीन टाईल्स बसविणे आदी महत्त्वपूर्ण कामे करण्यात येणार आहे. तालुका क्रीडा समितीकडे २८ लाख रुपयांचा निधी शिल्लक असून त्यामधूनच ही कामे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर सुविधा आणि कार्यालय व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता प्रस्ताव द्या, मी पाठपुरावा करतो, अशा सूचनासुद्धा पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यामुळे आगामी काळात दारव्ह्यातील खेळाडूंना चांगल्या सुविधा उपलब्ध होईल, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटिये प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.