जिल्हा विभाजनावर दारव्हा-नेरमध्ये प्रचंड रोष
By Admin | Updated: December 1, 2015 06:31 IST2015-12-01T06:31:02+5:302015-12-01T06:31:02+5:30
जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाने नवीन वादाला जन्म दिला असून पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला

जिल्हा विभाजनावर दारव्हा-नेरमध्ये प्रचंड रोष
प्रस्तावित नवा जिल्हा : पालकमंत्र्यांचा मतदारसंघच पुसदला जोडण्याचा घाट, नेरमध्ये बैठक
यवतमाळ : जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाने नवीन वादाला जन्म दिला असून पालकमंत्री संजय राठोड यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या मतदारसंघातील नेर, दारव्हा, दिग्रस हे तालुके पुसद जिल्ह्याला जोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यावरून स्थानिक नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात असून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
भौगोलिक विस्ताराने मोठा असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातून स्वतंत्र पुसद जिल्हा व्हावा यासाठी अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे. गेल्या काही दिवसात या आंदोलनाला चांगलीच धार आली. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने प्रस्तावित पुसद जिल्ह्याचा अहवाल तयार केला. या अहवालात पुसद जिल्ह्यामध्ये यवतमाळ मुुख्यालयापासून ३५ ते ४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर व दारव्हा तालुक्याचा समावेश करण्याचे सुुचविले आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून उघड केल्यानंतर याचे पुसदमध्ये स्वागत झाले. तर दारव्हा, नेर तालुक्यात रोष व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याच मतदारसंघाचे विभाजन होत असताना पालकमंत्र्यांना याची कोणतीच खबरबात कशी नाही, असा प्रश्नही जनतेकडून उपस्थित केला जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नेर तालुकावासीयांना प्रस्तावित जिल्ह्याचे ठिकाण ९५ किलोमीटर दूर पडणार आहे. हा प्रकार प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने नेर आणि दारव्हा तालुकावासीयांना डोकेदुखी ठरणार आहे.
या दोन तालुक्यांचा पुसदमध्ये समावेश करताना बोलीभाषेचा संदर्भ देण्यात आला. मात्र मुख्यालयापासून जवळ असलेले तालुके तोडून त्यांना दूर लोटण्याचे काम या अहवालातून करण्यात आले आहे. मुळात हा वादच पालकमंत्र्यांच्या निष्क्रियतेतून निर्माण झाल्याची प्रतिक्रिया नेर तालुकावासीयांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हा विभाजन अहवालाच्या विरोधात नेर येथे सोमवारी रात्री ९ वाजता नेर शहर संघर्ष समितीच्या वतीने सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, व्यापारी, पत्रकार, वकील, डॉक्टर, विद्यार्थी, प्रतिष्ठीत नागरिक यांची संयुक्त बैठकही आयोजित केली आहे. या बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया
४यवतमाळ या जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर अंतरावर असलेले दारव्हा आणि नेर हे दोन तालुके प्रस्तावित पुसद जिल्ह्यात समाविष्ठ करण्याच्या हालचाली सुरू आहे. या संदर्भात सोमवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच नेर आणि दारव्हा तालुक्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. पुसद जिल्ह्यात जाण्यास या परिसरातील नागरिकांंचा ठाम विरोध सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला.