धरणे आंदोलनाने एसटीला दहा लाखांचा फटका
By Admin | Updated: October 15, 2016 02:50 IST2016-10-15T02:50:58+5:302016-10-15T02:50:58+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट

धरणे आंदोलनाने एसटीला दहा लाखांचा फटका
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कामगारांच्या विविध समस्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामंडळाच्या यवतमाळ विभागाला जवळपास १0 लाखांचा फटका सला.
कामगार संघटनेचे यवतमाळ विभागीय सचिव तथा केंद्रीय कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील नऊ आगारातील जवळपास ९00 कर्मचारी सहभागी झाले होते. कामगार संघटना एकमेव मान्यताप्राप्त संघटना असल्याने या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. त्यामुळे महामंडळाला शुक्रवारी तब्बल २0७ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.
या धरणे आंदोलनामुळे प्रवाशांना खासगी व अनधिकृत वाहनांनी प्रवास करणे भाग पडले. यात महिला, बालकांची फरफट झाली. महिला व बालकांना नाईलाजास्तव बसस्थानकापासून दूर जाऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागला.
आंदोलनामुळे एसटीचा शुक्रवारी जवळपास ४५ हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. २०७ शेड्यूल रद्द झाल्याने यवतमाळ विभागाचे जवळपास १० लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. जिल्ह्यातील नऊही आगारांचे उत्पन्न बुडाल्यामुळे पुढील काळात ते भरून काढण्याचे आव्हान यवतमाळ विभागासमोर उभे ठाकले आहे. (शहर प्रतिनिधी)