१४ तालुक्यात नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षणच नाही
By Admin | Updated: April 18, 2015 02:10 IST2015-04-18T02:10:45+5:302015-04-18T02:10:45+5:30
अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

१४ तालुक्यात नुकसानीचे अद्यापही सर्वेक्षणच नाही
यवतमाळ : अवकाळी पावसाची सुमारे महिनाभरापासून जिल्ह्यात दररोज कुठे ना कुठे हजेरी आहे. या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले गेले. मात्र शासकीय यंत्रणेने अद्याप १४ तालुक्यात नुकसानीच्या सर्वेक्षणाला प्रारंभही केला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस नित्याचाच झाला आहे. उन्हाळा की पावसाळा हे समजणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यात रोजच कोण्या ना कोण्या तालुक्यात अवकाळी पाऊस पडतो आहे. वादळ, वारा, विजा यामुळे नुकसानही तेवढेच मोठे होते आहे. आधीच दुष्काळात असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आहे. कृषी, महसूल यंत्रणेकडून हे सर्वेक्षण अपेक्षित आहे.
मात्र प्रत्यक्षात ११ व १२ एप्रिलला पडलेल्या अवकाळी पावसाचे केवळ बाभूळगाव व महागाव या दोनच तालुक्यातील सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाले आहे. बाभूळगाव तालुक्यात १५३ तर महागाव तालुक्यात ६१ हेक्टर क्षेत्रात नुकसान दाखविले गेले आहे. उर्वरित १४ तालुक्यात अद्याप सर्वेक्षणच सुरू झाले नसल्याची माहिती आहे.
त्यामुळे तेथे नुकसान किती याचा शासकीय आकडा शोधणे कठीण झाले आहे. मार्च व एप्रिल या दोन महिन्यात संत्रा, आंबा, भाजीपाला या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. मात्र सर्वेक्षण झालेल्या दोन तालुक्यात केवळ एक हेक्टरमधील आंब्याला नुकसान झाल्याचा उफराटा अहवाल दिला गेला आहे.
दोन तालुक्यांमिळून २१४ हेक्टरमध्ये नुकसान दाखविले गेले आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात उमरखेड, दिग्रस, दारव्हा, कळंब, आर्णी, झरी या तालुक्यांमध्ये सर्वाधिक अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसानही तेवढेच मोठे आहे. भाजीपाला पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आजही अवकाळी पाऊस सुरू असून नुकसानही होतच आहे. मात्र त्यानंतरही १४ तालुक्यांमध्ये अद्याप सर्वेक्षण सुरू झालेले नाही. (शहर वार्ताहर)