करंजी हायवे पोलिसांची दबंगगिरी
By Admin | Updated: June 17, 2017 01:22 IST2017-06-17T01:22:09+5:302017-06-17T01:22:09+5:30
करंजी येथील हायवे पोलिसांच्या दबंगगिरीमुळे वाहनचालक कमाल’चे त्रस्त झाले आहे. महामार्गावरील

करंजी हायवे पोलिसांची दबंगगिरी
वाहनचालक त्रस्त : वाहनधारकांकडून बळजबरीने अवैध वसुली
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : करंजी येथील हायवे पोलिसांच्या दबंगगिरीमुळे वाहनचालक कमाल’चे त्रस्त झाले आहे. महामार्गावरील अपघातग्रस्ताना वेळीच मदत करण्याच्या हेतूने येथे महामार्ग पोलीस केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मुळ हेतूला हरताळ फासत येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी बळजबरीने अवैध वसुली करण्यातच मग्न असल्याचे दिसून येत आहे.
अवैध वसुलीसाठी देवधरी घाट व कोठोडा हे दोन फिक्स पॉर्इंट तयार करण्यात आले असून याठिकाणी खुलेआम तसेच रात्री-बेरात्री ट्रकचालकांना धमकवून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पदावर कार्यरत पोलीस अधिकारी मद्यप्राशन करून वाहनचालकांशी अरेरावी करीत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच धमकावून बळजबरीने व कारवाईचा धाक दाखवून अवैध वसुली करीत असल्याचेही सांगितले जाते. तसेच त्याचा येथील इतर कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याने करंजी येथील मधू नामक एका गुंड प्रवृत्तीच्या इसमाची नेमणूक करण्यात आली आहे.
मधू नामक इसम अवैध वसुलीच्या गोरख धंद्यावर लक्ष ठेवतो. येथील एपीआयच्या अशा अवैध वसुलीमुळे ट्रकचालकांमध्ये कमालिची दहशत पसरली असूनस अनेकवेळा वसुलीसाठी वाहनांना तासनतास रेंगाळत ठेवले जाते. याचा वाहतुकीवरही विपरीत परिणाम होताना दिसतो. रस्त्याच्या कडेला वाहनांची लांबच लांब रांग लागलेली येथून प्रवास करताना अनेकवेळा दिसून पडते.
अनेकदा तक्रारी करूनही वरिष्ठांचे दुर्लक्ष
अनेकवेळा तक्रारी करूनही हा प्रकार सुरूच असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहे. येथे कार्यरत एपीआय थेट मुख्यमंत्र्यांशी आपले संबंध असल्याची बतावणी करतो.तसेच कोणताच लोकप्रतिनिधी माझे वाकडे करू शकत नाही. तक्रार असल्यास कोणालाही मुख्यमंत्र्यांसमोर हजर करू शकतो, अशी भाषा वापरत असल्याचे वाहनधारक सांगतात. वाहनचालकांनादेखिल अशाच धमक्या देऊन ओव्हरलोडींग किंवा कागदपत्र तपासणीच्या नावाखाली रक्कम उकळली जाते. करंजी महामार्ग पोलीस केंद्रात सुरू असलेल्या या अवैध वसुलीच्या गोरखधंद्यावर त्वरित अंकुश लावण्याची लावण्यात यावा, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.