सिलिंडरचा ‘ब्रेक डाऊन’
By Admin | Updated: February 19, 2015 00:08 IST2015-02-19T00:08:51+5:302015-02-19T00:08:51+5:30
आॅनलाईन बुकिंग करून दोन आठवडे झालीत. घरातील दुसरे सिलिंडर संपायची वेळ आली आहेत. कधी मिळेल सिलिंडर. आमच्या घरी एकच सिलिंडर आहेत.

सिलिंडरचा ‘ब्रेक डाऊन’
रूपेश उत्तरवार यवतमाळ
आॅनलाईन बुकिंग करून दोन आठवडे झालीत. घरातील दुसरे सिलिंडर संपायची वेळ आली आहेत. कधी मिळेल सिलिंडर. आमच्या घरी एकच सिलिंडर आहेत. ते चार दिवसांपूर्वी संपले. स्वयंपाकाचा प्रश्न आहे. कधी मिळणार गॅस, अशा एका ना अनेक प्रश्नांनी गॅस एजंन्सीची कार्यालये दणाणून जात आहे. कारण प्रश्नच तसा आहे. गेली दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील नागरिकांना सिलिंडर तुटवड्याला तोंड द्यावे लागत आहे. एजन्सीसमोरील रांगा दररोज वाढत चालल्या आहेत. आता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कंपनीला गॅस पुरवठा दोन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यात वितरित होणारा गॅसचा पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी प्रतीक्षा यादी वाढली आहेत. पंधरा दिवसांपूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना अजूनही सिलिंडर मिळालेले नाहीत. इण्डेन गॅस आणि एचपी गॅस या दोन प्रमुख एजन्सीकडून जिल्ह्याला सिलिंडरचा पुरवठा होतो. दोन लाख सहा हजार ५०५ ग्राहक या एजन्सीकडून सिलिंडरची उचल करतात. सद्यस्थितीत सिलिंडर मिळाले नाही. परिणामी २५ एजन्सीमध्ये सिलिंडरसाठी ग्राहकांच्या येरझारा सुरू आहेत. पाच हजार ग्राहक सिलिंडरच्या प्रतीक्षेत आहेत. ग्राहकांनी पुरवठा विभागाकडे याबाबत धाव घेतली. मात्र गॅस एजन्सीचे समन्वय अधिकारी दखलच घ्यायला तयार नाही.
संपर्क अधिकाऱ्यांकडे सिलिंडरचा पुरवठा, एजन्सीची स्थिती, ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्याची संपूर्ण जबाबदारी आहे. याची प्रत्येक महिन्याला तपासणी अनिवार्य आहे. परंतु नियुक्त समन्वय अधिकारी वर्ष लोटले तरी, जिल्ह्यात फिरकतही नाही. त्यांचा भ्रमणध्वनीही प्रतिसाद देत नाही. जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांनी कंपनीला तुटवडा दूर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. दोन दिवसांत हा तुटवडा दूर करण्याच्या सूचना आहेत. यानंतरही तक्रारी उद्भवल्यास सर्वस्वी कंपन्याच जबाबदार असतील, असा उल्लेख त्यामध्ये प्रामुख्याने करण्यात आला आहे.