सेंट्रल बँकेत जागेअभावी ग्राहकांचे हाल
By Admin | Updated: August 19, 2015 02:48 IST2015-08-19T02:48:26+5:302015-08-19T02:48:26+5:30
शहरातील अग्रणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत कमी जागेमुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांचे प्रचंड हाल होत आहे.

सेंट्रल बँकेत जागेअभावी ग्राहकांचे हाल
मारेगाव : शहरातील अग्रणी सेंट्रल बँक आॅफ इंडिया शाखेत कमी जागेमुळे बँकेत येणाऱ्या खातेदारांचे प्रचंड हाल होत आहे.
शहरात गेल्या ३० वर्षांपूर्वी राष्ट्रीयीकृत सेंट्रल बँकेची शाखा उघडण्यात आली. या राष्ट्रीयीकृत बँकेत हजारो ग्राहकांसह शासनाच्या सर्व विभागांचे खाते आहे. दररोज या शाखेमार्फत लाखोंची उलाढाल होत असते. गेल्या ३० वर्षांपासून या बँकेचे कामकाज भाड्याच्या प्रशस्त इमारतीत सुरू होते. ग्राहकांना या बँकेतून उत्तम सेवा मिळत होती. मात्र ही इमारत दुरूस्तीला आल्याने या बँकेचे स्थानांतरण यवतमाळ-वणी रस्त्यावरील दुसऱ्या कमी विस्ताराच्या भाड्याच्या इमारतीत करण्यात आले आहे. तेथे कमी जागेमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
या बँकेत शेतकरी, विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संख्या अधिक असल्याने बँकेत ग्राहकांना उभे राहण्यासाठी जागा कमी पडत आहे. सदर इमारत मोठी असताना माजी बँक व्यवस्थापकांनी अर्धीच जागा २० वर्षांच्या करारावर भाड्याने घेऊन कमी जागेत बँक थाटली. सुमारे १५ बाय ६० च्या लांब जागेत बँकेचा पसारा आहे. तेथे एकच काऊंटर आहे. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्याचा सर्वाधिक फटका वृद्ध, निराधार, पेन्शनधारक व विद्यार्थ्यांसह इतर ग्राहकांना सहन करावा लागतो. या प्रकाराने ग्राहकांचा वेळ, श्रम यांचा अपव्यय होत आहे. त्यामुळे बँकेच्या खातेदारांकडून संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांना त्यांच्या व्यवहारासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. अपुऱ्या जागेमुळे धड रांगही लावता येत नाही. या बँकेतील ग्राहकांची संख्या शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्याच्या ठिकाणी सर्वप्रथम ही बँक सुरू झाल्याने अनेकांनी या बँकेत खाते उघडले आहे. त्यामुळे आता खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकांना इतर कामासाठी गेल्यावर बँकेतील अपुऱ्या जागेचा त्रास सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)