ग्राहकांची गर्दी अन् कोट्यवधींची उलाढाल
By Admin | Updated: September 11, 2016 00:58 IST2016-09-11T00:58:01+5:302016-09-11T00:58:01+5:30
मंदीच्या लाटेमुळे गेली काही वर्ष बाजारपेठेवर आलेली मरगळ दूर होत असल्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत.

ग्राहकांची गर्दी अन् कोट्यवधींची उलाढाल
यवतमाळ : मंदीच्या लाटेमुळे गेली काही वर्ष बाजारपेठेवर आलेली मरगळ दूर होत असल्याची सकारात्मक चिन्हे दिसू लागली आहेत. गौरी-गणेशोत्सवामुळे बाजारपेठेतील वर्दळ वाढली असून कोट्यवधी रुपयांची उलाढालही होऊ लागली आहे. एकट्या वाहन उद्योगात यवतमाळात चार कोटी रुपयांची उलाढाल गेल्या काही दिवसांत झाल्याचे एका विक्रेत्याने ‘लोकमत’ला सांगितले.
बाजारपेठेतील गर्दी पाहून व्यापारी-व्यावसायिकही सुखावला आहे. ही गर्दी आणि त्यातून होणारी उलाढाल जणू लोप पावली होती. परंतु आता हे चित्र बदलत आहे. व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आशावाद झळकतो आहे. बाजारपेठेतील मरगळ किंचितशी का असे ना दूर होताना दिसते आहे. त्यामुळे व्यापारी वर्गात उत्साह पहायला मिळतो आहे. गौरी आगमन व गणेशोत्सवाच्या निमित्ताने यवतमाळच्या बाजारपेठेमधील गर्दी बऱ्यापैकी वाढल्याचे चित्र आहे. आगामी नवरात्रोत्सव-दुर्गोत्सव आणि दसरा-दिवाळीमध्ये ही गर्दी प्रचंड वाढण्याची आणि त्यातूनच बाजारपेठेतील उलाढाल दुप्पट-चौपट होण्याचे संकेत मिळत आहेत. बाजारपेठेतील आर्थिक घडामोडींचा तगडा अभ्यास असलेल्या व्यापाऱ्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. मंदीची लाट दूर सारुन बाजारपेठेत तेजी यावी ही व्यापाऱ्यांची आशा फळाला येण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झालेला सातवा वेतन आयोग हे प्रमुख कारण त्यासाठी सांगितले जाते.
यावर्षी गौरी-गणपतीच्या पर्वावर चार कोटींची वाहने विकली गेली आहे. इतर चैनिच्या वस्तू आणि मोबाईल कंपन्याच्या आॅफरमुळे बाजारपेठ अधिकच तेज झाली आहे. या पर्वात ४०० दुचाकी वाहने विकली गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गतवर्षाच्या तुलनेत यामध्ये ५० टक्के वाढ झाली असून ही उलाढाल अडीच कोटींच्या घरात आहे. तर विविध शोरूममधुन ३५ कार्सचे बुकींग झाले होते. ही उलाढाल दीड कोटीच्या घरात आहेत. मोबाईल हँडसेटचे दर उतरविण्यात आले. मोबाईल शॉपिंगसाठी तरूणाच्या रांगा लागलेले चित्र पहायला मिळत आहे. सोने चांदी, कापड, चैनिच्या वस्तुची मोठया प्रमाणात खरेदी झाली. (शहर वार्ताहर)