कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:57 IST2018-09-05T23:56:22+5:302018-09-05T23:57:06+5:30
शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.

कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात
के.एस. वर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.
नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये केवळ वीज, पाणी, फर्निचर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. किरकोळ बाबींची पूर्तता न झाल्याने या वास्तू पडून आहे. या वास्तूंचा औपचारिक शुभारंभ करून त्या जनसेवेत उपयोगात आणल्या जाऊ शकतात. उर्वरित कामे शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावून या वास्तूंचे लोकार्पण होणे गरजेचे आहे. यात तब्बल आठ कोटी २५ लाख रुपये खर्चून प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र वीज व फर्निचरसारख्या किरकोळ कामांना विलंब लागत आहे. त्यामुळे हे वास्तू धूळ खात पडून आहे.
पाच कोटी ९० लाख रुपये खर्चून सुंदर, सुबक सामाजिक न्याय भवनाची इमारत उन्हाळ्यातच बांधून पूर्ण झाली. तेथे वीज जोडणीची कामे सुरू आहे. ही वास्तू आत्तापर्यंत उपयोगात येण्याची अपेक्षा असताना छोट्या-छोट्या करणाने त्यास विलंब होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याकरिता वास्तूच्या लोकार्पणास उशीर होत असल्याची चर्चा आहे. अडीच कोटी रुपयांचे ट्रामा केअर सेंटर अनेक महिन्यांपूर्वीच बांधून पूर्ण झाले. वीज व केवळ त्याकरिता पद भरती झाली नसल्याने ते जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही.
नुकताच कळंब ते वडकी हा सिमेंट रोड बांधून झाल्यानंतर अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज अपघात घडत आहे. त्यामुळे ट्रामा सेंटर त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.
३० तलाठी भवन ठरले शोभेचे
तालुक्यात ३० पटवारी भवन निवासस्थानांसह दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाले. मात्र वीज, पाणी नसल्याने ते पटवाऱ्यांकरिता व पर्यायाने जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही. चार ते पाच कोटी रुपये खर्च होऊनही विलंबामुळे नव्या इमाारती जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जानेवारीला नगरपंचायतीच्या नऊ कामांचे भूमिपूजन झाले होते. त्यापैकी अनेक कामे आठ महिने होऊनही पूर्णत्वास गेले नाही.