कोहळाच्या लाचखोर सरपंचाला अटक
By Admin | Updated: November 19, 2014 22:48 IST2014-11-19T22:48:18+5:302014-11-19T22:48:18+5:30
सिंचन विहिरीच्या मंजूर निधीचा धनादेश खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कोहळा येथील सरपंचाला बुधवारी अटक करण्यात आली.

कोहळाच्या लाचखोर सरपंचाला अटक
नेर : सिंचन विहिरीच्या मंजूर निधीचा धनादेश खात्यात जमा करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कोहळा येथील सरपंचाला बुधवारी अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी केली.
नंदकुमार चंद्रभान तलवारे असे लाच मागणाऱ्या सरपंचाचे नाव आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कोहळा येथील सुरेश राठोड यांंना विहीर मंजूर झाली. त्यासाठी त्यांना एक लाख ९० हजार रुपये मिळणार होते. त्यापैकी ५०-५० हजार प्रमाणे एक लाख रुपये मिळालेही होते. त्यानंतर दिवाळीपूर्वी ६५ हजार रुपयांचा धनादेश आल्याची माहिती सचिवाने दिली होती. त्यामुळे राठोड सरपंच नंदकुमार तलवारे यांंना भेटला. त्यावेळी सरपंचाने यापूर्वी एक लाख रुपये मिळाले आहे आता उर्वरित पैसे काढण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली. वारंवार विनंती करूनही उपयोग होत नव्हता. शेवटी राठोड यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून अधिकाऱ्यांनी पंचासमोर लाचेची चाचपणी केली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी सापळा रचण्यात आला. मात्र तहसील कार्यालयाजवळ पैसे घेण्यासाठी येण्याचे सांगूनही तो आला नाही. नंतर राठोड याला पैसे घेऊन घरी बोलाविले. मात्र तेथेही सरपंच पोहोचला नाही. त्यामुळे हा ट्रॅप फसला. परंतु फोनवरील रेकॉर्डिंग आणि पंचाच्या बयाणावरून बुधवारी सरपंच नंदकुमार तलवारे याला त्याच्या घरून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, कर्मचारी अरुण गिरी, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, गजानन राठोड, शैलेश ढोणे, अमित जोशी, अमोल महल्ले, नीलेश पखाले, सुधाकर मेश्राम, अनिल राजकुमार, भारत चिरडे, किरण खेडकर, विशाल धलवार यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)