पुसदमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:42+5:30
कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण्यात आली.

पुसदमध्ये खरेदीसाठी उसळली गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : गेल्या ४८ दिवसांपासून जिल्ह्यात टाळेबंदी आहे. रविवारी प्रशासनाने टाळेबंदीत शिथीलता देताच शहरातील दुकाने उघडण्यात आली. खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
कोरोनामुळे गेल्या ४८ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडता इतर सर्व दुकाने बंद आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून सर्वच दुकाने आळीपाळीने उघडण्याची परवानगी दिली. तसेच दुकानांची वेळही दोन तासांनी वाढवून देण्यात आली. त्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी शहरातील बहुतांश दुकाने उघडली गेली. संचारबंदीत शिथीलता मिळताच नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली.
बाजारपेठेत नागरिकांची झुंबड उडताच शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम पोलीस ताफ्यासह बाहेर पडले. त्यांनी लाऊडस्पिकरवरून गर्दी न करण्याचे तसेच फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन केले. मात्र नागरिकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याचे आढळले नाही. गर्दीचा मात्र दुकानदारांनी पुरेपूर लाभ उचलला. पहिल्यांदाच दुकाने पूर्णपणे उघडले तरी नागरिकांनी लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड यांनी केले.
दारू खरेदीसाठी झुंबड
शहरातील मद्य विक्रीच्या दोनपैकी एक दुकान रविवारी उघडले गेले. वसंतनगर येथील या दुकानातून मद्य खरेदीसाठी तळीरामांची झुंबड उडाली होती. शहरातील देशी दारूची दुकानेसुद्धा सोमवारी सुरू झाली. मात्र त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी आढळली नाही.