मोहा परिसरात समस्यांची गर्दी
By Admin | Updated: September 11, 2016 00:59 IST2016-09-11T00:59:54+5:302016-09-11T00:59:54+5:30
नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या मोहा परिसरात नानाविध समस्या निर्माण झालेल्या आहेत.

मोहा परिसरात समस्यांची गर्दी
सुविधांची टंचाई : जय भगवान महासंघाची पालिकेवर धडक
यवतमाळ : नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या मोहा परिसरात नानाविध समस्या निर्माण झालेल्या आहेत. नगरपरिषदेकडून कुठल्याही सुविधा या भागाला पुरविल्या जात नाही. घाणीचे साम्राज्य, बंद पथदिवे, सांडपाण्याच्या तुंबलेल्या नाल्या, रस्त्याची दुर्दशा आदी प्रश्नांना या भागातील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
मोहा ग्रामपंचायतीत सात ते आठ गावांचा समावेश होता. आता हा सर्व परिसर हद्दवाढीमुळे नगरपरिषद हद्दीत आला आहे. गावातील पथदिवे कित्येक दिवसांपासून बंद आहे. परिणामी नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतो. शहरभर स्वच्छता मोहीम राबविली जात असताना सदर परिसरात कचऱ्याचे ढीग तयार होत आहेत. गाजर गवत चार ते पाच फूटपर्यंत वाढले आहे. कुठल्याही भागात रस्त्यावर मुरूम टाकला जात नसल्याने पाऊस झाल्यास नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागतो. मासोळी परिसराला पाणीपुरवठा करणारा संच बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. ही माहिती पालिकेला देऊनही दुर्लक्ष सुरू आहे.
या भागातील समस्या जय भगवान महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेकडे मांडल्या. मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी महासंघाचे जिल्हा प्रमुख विनोद सानप, तालुका प्रमुख अमोल घुले, उपजिल्हा प्रमुख बळीराम गायकवाड, ज्ञानेश्वर घोळवे, शंकर तलवारे, सुनील कुंभेकार, युवराज दराडे, गोलू नागरगोजे, देवानंद आत्राम, पिंटू सानप, मच्छिंद्र सानप, अजय मिसाळ, अमोल दाभेरे, प्रमोद टेकाम, राहुल सानप, संतोष बांगर, मनोज मोरे, आकाश मोरे, प्रभूजी कराड, अरुण सानप, हेलोंडे पाटील आदी उपस्थित होते. (वार्ताहर)