हनुमान चालीसा पठनासाठी गर्दी
By Admin | Updated: April 12, 2017 00:05 IST2017-04-12T00:05:15+5:302017-04-12T00:05:15+5:30
हनुमान जयंती दिनी हनुमान भक्तांनी एकत्र येत हनुमान चालीसाचा सवालाख जप केला. शेकडो भाविकांनी एकाचवेळी हनुमान चालीसा पठनाची यवतमाळातील ही पहिलीच वेळ.

हनुमान चालीसा पठनासाठी गर्दी
१०१ किलोचा लाडू : सामाजिक प्रबोधनावर भर
यवतमाळ : हनुमान जयंती दिनी हनुमान भक्तांनी एकत्र येत हनुमान चालीसाचा सवालाख जप केला. शेकडो भाविकांनी एकाचवेळी हनुमान चालीसा पठनाची यवतमाळातील ही पहिलीच वेळ. या आगळ्यावेगळ्या उपक्रमासाठी शहरासह लगतच्या भागातील भाविकांनी गोरक्षण संस्थानमध्ये मंगळवारी एकच गर्दी केली होती.
येथील गोरक्षण संस्थानमध्ये सुमती मंडळ, वैदेही मंडळ व रामायण मंडळाच्या संयुक्तवतीने सव्वालाख हनुमान चालीसा पठनाचे आयोजन करण्यात आले. याकरिता गोंदियाचे गायक माधव गारसे व चमू यवतमाळात दाखल झाली. त्यांच्या नेतृत्वात दुपारी ३ वाजता सुरू झालेले हे पठन सायंकाळी ७ वाजता समाप्त झाले. आयोजकांनी भाविकांना हनुमान चालीसा व नारळांचे वितरण केले. या ठिकाणी साकारण्यात आलेला राम दरबार, नारळाचा पर्वत आणि गोमाता देखावा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. गो संरक्षणचा संदेश यातून देण्यात आला. गोरक्षण संस्थानचे नंदलाल बागडी, अनिल अटल, ब्रिजमोहन भरतीया, किसनलाल सिंघानिया, रमेशभाई मजेठीया यांच्यासह अनेकांनी सहकार्य केले.
स्थानिक हनुमान आखाडा चौकातही हनुमान जयंती उत्सव साजरा केला जात आहे. भक्तांच्या वैचारिक प्रबोधनासाठी येथे किर्तनांची व्याख्यानमाला घेण्यात आली. हनुमान जयंतीच्या पूर्व संध्येला बाल किर्तनकार ह.भ.प. सई पंचभाई यांनी ‘हनुमानाची भक्ती’ या विषयावर विमोचन केले. मंगळवारी सुंदरकांड कार्यक्रम झाला. येथे १०१ किलो वजनाचा मेव्याचा लाडू रमेश यादव, सचिन जाधव, मुरली पवार यांनी हनुमंताच्या चरणी अर्पण केला. यावेळी बजरंग दलाचे विदर्भ प्रांत प्रमुख अटलबिहारी पांडे उपस्थित होते.
संकट विमोचन मंदिरात मंगळवारी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या. येथे भक्तांची सर्वाधिक गर्दी होती. ढुमणापूर, वनवासी मारूती, वाघापूर मार्गावरील रिंंगरोड परिसरातील मंदिरात महाप्रसाद वितरित करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यातीेल विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. (शहर वार्ताहर)