घोन्सा येथे उसळली भाविकांची गर्दी

By Admin | Updated: March 4, 2016 02:39 IST2016-03-04T02:39:25+5:302016-03-04T02:39:25+5:30

वणी तालुक्यातील भाविकांसाठी प्रती शेगाव ठरलेल्या येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रमात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मंगळवारी भक्तांची गर्दी उसळली होती.

A crowd of devotees from Ghanssa | घोन्सा येथे उसळली भाविकांची गर्दी

घोन्सा येथे उसळली भाविकांची गर्दी

प्रकट दिन महोत्सव : परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
घोन्सा : वणी तालुक्यातील भाविकांसाठी प्रती शेगाव ठरलेल्या येथील श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रमात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त मंगळवारी भक्तांची गर्दी उसळली होती. यानिमित्त १० फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
मंगळवारी सकाळी गावातील प्रमुख मार्गाने श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीत चंद्रपूर, भंडारा, नांदेड, अकोला व लगतच्या तेलंगणा राज्यातील भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ सहभाग होते. गावातील युवतींनीही डोक्यावर कलश घेऊन पालखीत सहभाग नोंदविला. पालखी गजानन महाराज मंदिरापासून निघाली. पालखी मार्गावरील विविध चौकात भाविकांसाठी महाप्रसाद व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पालखी दुपारी परत मंदिरात पोहोचली. तेथे हभप गोफणे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर लगेच महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली. मंगळवारी रात्रीपर्यंत घोन्सा व परिसरातील भाविकांनी यात्रा महोत्सवाचा आनंद लुटला. सायंकाळी भाविकांसह वरूण राजानेही मंदिर परिसरात हजेरी लावली. या महोत्सवादरम्यान एकल व समूह नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम, घटस्थापना, होमहवन, प्रा.डॉ.दिलीप अलोणे, राम झिले व संच बहुरंगी नकलांचा कार्यक्रम, रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिर, राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम, खंजिरी भजन व पदावली भजन स्पर्धा घेण्यात आली.
खंजिरी भजन स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ९८ हजार ५० रूपयांची बक्षिसे, तर पदावली भजन मंडळातील विजेत्यांना २७ हजार ७०० रूपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. यात्रा महोत्सवासाठी श्री.संत गजानन महाराज श्रद्धाश्रमच्या सर्व पदाधिकारी, श्री सेवक व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: A crowd of devotees from Ghanssa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.