अपॉइंटमेंटनंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी-गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 05:00 IST2021-05-03T05:00:00+5:302021-05-03T05:00:02+5:30
नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू होण्याऐवजी ते ११ वाजता सुरू झाले. रांगेत लागलेल्या ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले. पाटीपुरा व लोहारा येथे गर्दी उसळल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

अपॉइंटमेंटनंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी-गोंधळ
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : १८ वर्षावरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाचा रविवारी शहरात फज्जा उडाला. ४५ वर्षांवरील आणि १८ ते ४४ वयोगटांतील सर्वच एका रांगेत लागले. टोकणही वाटप झाले. मात्र पहिल्याच दिवशी गर्दी टाळण्याचा प्रयत्न फसला.
जिल्हा प्रशासनाने १८ वर्षे वयोगटावरील व्यक्तींसाठी जिल्ह्यात पाच केंद्र सुरू केले. त्यांच्यासाठी सात हजार ५०० कोविशिल्ड लसीचे डोस उपलब्ध करून दिले. लसीकरण केंद्र यवतमाळ शहरात लोहारा व पाटीपुरा, पुसद, दारव्हा आणि पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयात होते.
नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करून सकाळीच लसीकरण केंद्रावर निर्धारित वेळेत पोहोचले. मात्र, तेथे ज्येष्ठ नागरिकही रांगेत लागलेले होते. टोकण वितरितही करण्यात आले. लसीकरण केंद्रावर पुरेशा सूचना नसल्याने सकाळी दोन तास गोंधळाची स्थिती होती. ९ वाजता लसीकरण सुरू होण्याऐवजी ते ११ वाजता सुरू झाले. रांगेत लागलेल्या ज्येष्ठांना लसीकरण केंद्रावरून परत जावे लागले. पाटीपुरा व लोहारा येथे गर्दी उसळल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.
पाच तास रांगेत लागून परतावे लागले
शहरातील लोहारा येथील लसीकरण केंद्रावर गोरगरीब वर्ग मजुरी बुडवून रांगेत लागतो. पाच तास रांगेत उभे राहूनही त्यांना लस संपल्याचे कारण सांगून परत पाठविले गेले. लसीकरण केंद्रावर उपलब्ध लस किती तितक्याच नागरिकांची तेथे नोंदणी करून घेणे अपेक्षित आहे. मात्र, याचा ताळमेळ नसल्याने लस मिळेल, यासाठी रांगेत ताटकळत असलेल्या अनेकांना शेवटच्या क्षणी लस संपल्याचे सांगून परत पाठविले जाते.