काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गर्दी
By Admin | Updated: January 18, 2017 00:03 IST2017-01-18T00:03:51+5:302017-01-18T00:03:51+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेसने सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

काँग्रेसच्या उमेदवारीसाठी गर्दी
नेत्यांसमोर ‘प्रझेंटेशन’: सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती
यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी काँग्रेसने सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यासाठी काँग्रेस कार्यालयात इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती.
येत्या १६ फेब्रुवारीला जिल्हा परिषदेच्या ६१, तर पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी काँग्रेसने इच्छुकांना मुलाखतीसाठी पाचारण केले होते. यात पुसद, उमरखेड, महागाव, आर्णी, पुसद, यवतमाळ आणि घाटंजी या सात तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी पार पडल्या. पक्ष निरीक्षक श्याम उमाळकर, जिल्हाध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, माजी आमदार कीर्ती गांधी व विजय खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, सचिन नाईक, वजाहत मिर्झा, राहुल ठाकरे, तातू देशमुख, मोहम्मद नदीम, देवानंद पवार, अरूण राऊत आदींच्या संसदीय मंडळाने त्यांच्या मुलाखती घेतल्या.
प्रत्येक तालुक्यातील संबंधित जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना मंडळाने आत्तापर्यंत कोणती पदे भूषविली, किती वर्षांपासून पक्षात काम करीत आहात, उमेदवारी तुम्हालाच का द्यावी, आदी प्रश्न केले.
प्रत्येक गटासाटी किमान पाच इच्छुकांनी पक्षाकडे दावा केल्याचे सांगण्यात आले. गटनिहाय या मुलाखती पार पडल्या. बाहेर इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली होती. दर पंचवार्षिक प्रमाणेच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच दिसून येत होती. उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती.
गुरूवारी उर्वरित नऊ तालुक्यांमधील इच्छुकांच्या मुलाखतींचे सोपस्कार पार पाडले जाणार आहे. आता काँग्रेस कुणाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)
माजी राज्यमंत्र्यांनी फिरविली पाठ
माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी या मुलाखतींकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यांच्या अनुपस्थितीमुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संजय खोडके यांची उमेदवारी दाखल करण्यासाठी अमरावतीला गेले होते.
उमरखेडमध्ये सर्वाधिक चुरस
सात तालुक्यांपैकी उमरखेड तालुक्यात सर्वाधिक चुरस होती. या तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सर्वाधिक ९० इच्छुकांनी मुलाखतीला हजेरी लावली. महागाव तालुक्यातून ५८, पांढरकवडा ५१, यवतमाळ ४८, आर्णी ४७, तर घाटंजी तालुक्यातून ४२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या. सर्वात कमी इच्छूक पुसद तालुक्यात होते. या तालुक्यातून केवळ २८ इच्छुकांनी हजेरी लावली.