महिला पतसंस्थेत कोट्यवधी रुपये बुडाले
By Admin | Updated: December 3, 2014 22:58 IST2014-12-03T22:58:15+5:302014-12-03T22:58:15+5:30
महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली.

महिला पतसंस्थेत कोट्यवधी रुपये बुडाले
राळेगाव : महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था राळेगावमध्ये ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. या संदर्भात शहरातील काही जागरूक नागरिकांनी पुढे येवून ठेवीदारांच्या समर्थनार्थ अभिकर्त्यांसह वेळोवेळी विविध आंदोलने केली. विजयराज शेगेकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मे महिन्यापासून हे सतत सुरू असून संस्थेच्या अध्यक्ष लता वनकर, संचालिका, व्यवस्थापक आदींवर १८ आॅगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आतापर्यंत संबंधित एकाही दोषीला अटक झालेली नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांमध्ये असंतोष पसरला आहे.
सहकार विभागाने या संस्थेचे विशेष वैधानिक लेखा परीक्षण यवतमाळ येथील प्रमाणित लेखा परीक्षक एम.जी. वानखेडे यांच्याकडून करवून घेतले. त्यांनी आपला अहवाल १५ सप्टेंबर रोजी येथील सहायक निबंधकांकडे सादर केला. या अहवालावरून शासन त्वरित जागे होईल आणि त्वरित शासनातर्फे आॅडिट रिपोर्टसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करतील आणि त्यावरून तरी पोलीस दोषींना अटक करतील, अशी अपेक्षा होती. मात्र या बाबतीतही सर्वत्र सावळा गोंधळ आणि मंदगती सुरू आहे.
आॅडिट रिपोर्टवर सरकारी वकीलांना सल्ला मागून रिपोर्टबाबत पुढील कारवाई करण्याचे निर्देश सहकार विभागाने आॅडिटरला दिले आहे. पण अद्यापही सल्ला, सूचना प्राप्त झाली नसल्याने पुढील कारवाई थांबली आहे. संचालक मंडळाने कर्ज वितरित करताना योग्य ती खबरदारी घेतली नाही, आवश्यक ती कागदपत्र आणि तारणाशिवाय कर्ज वितरण करण्यात आले, कर्ज वसुलीसाठी प्रयत्न केले नाही वा कोणत्याही सभासदावर ठोस कारवाई करण्यात आली नाही, ६० ते ७० टक्के एवढीच रक्कम कर्ज रूपाने वाटप करावयाची असताना ८६ टक्के कर्जवाटप करण्यात आले. संस्थेच्या सचिव, पाच संचालिका एक लाख ३७ हजार ७५० रुपयांच्या थकबाकीदार आहे, त्यांना संस्थेच्या समितीचे सदस्य राहता येत नाही आदी बाबी आॅडिटमध्ये नमूद करण्यात आल्या आहे. यानंतरही कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)