कीड नियंत्रणासाठी क्रॉपसॅप प्रकल्प
By Admin | Updated: June 15, 2015 02:28 IST2015-06-15T02:28:53+5:302015-06-15T02:28:53+5:30
शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा या पिकांवरील किडरोगांच्या ...

कीड नियंत्रणासाठी क्रॉपसॅप प्रकल्प
दारव्हा : शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा या पिकांवरील किडरोगांच्या व्यवस्थापनासाठी कीड सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राज्यात राबविण्याकरिता शासनाने सात कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.
राज्यात गेल्या काही वर्षातील पावसाची अनियमितता, त्यामुळे पडाणारा खंड आणि त्यानुसार हवामानात होणारे चढउतार यामुळे पीकांवरील कीड आणि रोगांच्या वाढीकरिता अचानक निर्माण झालेल्या विशिष्ट अनुकूल परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मागील काही वर्षामध्ये प्रामुख्याने सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा विदर्भ आणि मराठवाडा विभागामध्ये प्रादुर्भाव होवून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते.
कापूस व सोयाबीन ही नगदी पिके, भात हे तृणधान्य वर्गीय पीक तसेच तूर व हरभरा ही कडधान्य वर्गीय पिके शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टीने महत्त्वाची आहेत.
सदर पिकांवर उद्भवणाऱ्या किडरोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात घट होवून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळता यावे यासाठी कृषी विभागामार्फत कापूस, सोयाबीन, भात, तूर व हरभरा पिकावरील किडरोगाच्या व्यवस्थापनासाठी सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) आखण्यात आला असून त्याद्वारे शेतकऱ्यांना किडरोग सर्वेक्षणाच्या आधारे करावयाच्या पीक संरक्षण उपाययोजना या बाबतचे संदेश देणे, शेतकऱ्यांमध्ये कीडरोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षित करून किडरोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे, कीड रोगांच्या प्रादुर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे व पुढील संभाव्य नुकसान एकूण उत्पादनात वाढ करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये कापूस, सोयाबीन, भात व तूर पिकावरील व २९ जिल्ह्यांमध्ये हरभरा पिकावरील कीड रोगांच्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन केंद्र, नवी दिल्ली, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, राष्ट्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था, हैद्राबाद यासह इतर संस्थांच्या सहभागाने या हंगामात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)