राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:47 IST2019-08-07T13:45:09+5:302019-08-07T13:47:40+5:30
राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.

राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा
रूपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. तर उर्वरित २० लाख शेतकरी पाच विभागांतील आहेत. ५३ लाख ४८ हजार हेक्टरवरील पीक संरक्षित झाले आहे. तर ९० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. त्यामुळे तेथील पीक रामभरोसे राहणार आहे.
कोकण, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर २४ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या स्थितीत राज्यातील सर्वच विभागातील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.
सर्वाधिक पीक विमा औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी उतरविला आहे. या ठिकाणी ४१ लाख ८ हजार ४१० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात सर्वाधिक शेतकरी बिड जिल्ह्यातील आहे. तेथील २० लाख ८३ हजार ८० शेकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. राज्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. लातूर विभागातील ३६ लाख ६१ हजार ३०३ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील ११ लाख शेतकऱ्यांनी, तर अमरावती विभागात १० लाख ४१ हजार ८३८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र यवतमाळ जिल्ह्याचे आहे. या ठिकाणी तीन लाख ५४ हजार ३५५ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.
शेतकऱ्यांनी भरले ४४१ कोटी
पीक विमा उतरविताना काही वाटा शेतकऱ्यांना भरायचा होता. राज्यातील एक कोटी सात लाख २४ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. ४४१ कोटी ८७ लाख २२ हजार ६८१ रूपये विमा कंपनीकडे वळते केले. यामुळे ५३ लाख ४८ हजार ९८६ हेक्टरवरील पीक संरक्षित झाले. १७ हजार ९९९ कोटी ७७ लाख नऊ हजार ९४० रूपयांच्या नुकसान भरपाईची हमी विमा कंपनीने उचलली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. यावर्षी त्यामध्ये वाढ नोंदविली गेली आहे. यावर्षीची स्थिती पाहता शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.
- डॉ. अनिल बोंडे,
कृषीमंत्री