हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:51 IST2017-08-25T21:51:04+5:302017-08-25T21:51:26+5:30
गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला.

हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात
मुकेश इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : गेल्या काही वर्षात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यात अल्प प्रमाणात आणि तुरळक पाऊस पडल्याने त्याचा परिणाम पिकांवर झाला. त्यातच सध्या मोठ्या प्रमाणात रोग आल्याने तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पीक धोक्यात सापडले आहे.
आॅगस्ट महिना संपत आला तरी ३५१ मिमीच्या वर पाऊस पडला नाही. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे उत्पन्न ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात ६६ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. जूनमध्ये पेरण्या आटोपल्यानंतर या महिन्यात २०९ मिमी पाऊस कोसळल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र जुलैमध्ये प्रमाण घटून १११ मिमी पाऊस आला. त्यामुळे ऐन महत्त्वाच्या काळात पावसाने दगा दिल्याने पीक हिरवी दिसत असली तरी त्याचा उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. पाऊस गायबच झाल्याने कोरडवाहू भागातील कापूस, सोयाबीन पिके सुकली आहे. मूग आणि उडीदाच्या उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे.
आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत केवळ ३१५ मिमी पावसाची नोंद झाली. पाऊस यावेळी फारच कमी पडला आहे. कमी पावसामुळे नदी, नाले कोरडे पडले आहे. कोणत्याही प्रकल्पाने ५० टक्क्यापर्यंतही पातळी गाठली नाही. ६७.२५ दलघमी साठवण क्षमता असणाºया म्हसणी धरणात १९.८५ दलघमी पाणीसाठा आहे, तर पाथ्रड, कुंभारकिन्हीसह इतर छोट्या प्रकल्पाने तळ गाठला आहे. मुबलक पाऊस न पडल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढली नाही. परिणामी विहिरी आटल्या. ओलिताची सोय असणाºया शेतकºयांच्या कपाशीची स्थिती चांगली असली तरी आता मात्र पाणी पुरत नाही. त्यामुळे पीक हिरवी दिसत असली तरी यावर्षी उत्पादनात घट होणार असं मानलं जात आहे. त्यामुळे शेतकºयांची काळजी पुन्हा एकदा वाढली आहे.
पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
कमी पाऊस, प्रतिकूल वातावरण यामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग आला आहे. सोयाबीनवर तर गेल्या दहा वर्षात पाहिली नाही एवढी अळी असल्याचे सांगण्यात येते. एका झाडावर २५ च्या वर अळ्या आढळतात. तर कपाशीवर फुलकिडा पांढरी माशी हा रोग आल्याने झाडांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे कपाशी, सोयाबीन या पिकांची दुरावस्था झाली असून शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कमी पाऊस त्यातच पिकांवरील रोगामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असली तरी कृषी खात्याचे जिल्ह्यातील अधिकारी मात्र परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगत आहे.