सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी सापडला संकटात
By Admin | Updated: February 11, 2015 00:13 IST2015-02-11T00:13:21+5:302015-02-11T00:13:21+5:30
शेतकऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

सक्तीच्या कर्जवसुलीमुळे शेतकरी सापडला संकटात
यवतमाळ : शेतकऱ्यांकडून सक्तीच्या कर्जवसुलीमुळे विदर्भातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या स्थितीसंदर्भात त्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथे आपल्या सरकारचा १०० दिवसांचा लेखाजोखा मांडत होते त्याचवेळी विदर्भात मात्र सहा दुष्काळग्रस्त शेतकरी सक्तीची कर्जवसुली, नापिकी तसेच कापूस, तुरी व धानाला मातीमोल भाव मिळत असल्यामुळे यवतमाळ जिल्यातील शीरमाळ येथे ग्यानबा मोरे, राजुर येथे प्रमोद बल्की, चंद्रपूर जिल्यात हळदा येथे मुरलीधर चिमूरकर, गडचिरोली जिल्हयातील कमळगावचे धर्मा आभारे, अमरावती जिल्यातील माउली येथील सुनील गवई व वर्धा जिल्यातील उमरी येथील गोपाळ खंडाईत हे आत्महत्या करून जीवनयात्रा संपवीत होते, अशी माहिती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली.
एकीकडे मुख्यमंत्री, अलीकडेच मी डावोस येथे भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जाऊन आलो. तेथे मी शेतकऱ्यांसाठी व्हॅल्यू चेन उभारण्याबाबत काही महत्त्वाच्या कंपन्यांशी चर्चा केली. यानुसार दहा लाख शेतकऱ्यांचा काही परदेशी कंपन्याबरोबर थेट करार होईल. शेतमालावर प्रक्रिया करून उत्पादने विकणाऱ्या कंपन्या १४ प्रकारची बियाणे शेतकऱ्यांना देतील व पुढल्या वर्षी २५ लाख शेतकऱ्यांशी असे करार करण्यात येणार आहेत, अशी महत्त्वपूर्ण योजना मुंबईत सह्यान्द्री येथे पत्रकारांना सांगत होते. त्याचवेळी मुख्यमंत्र्यांना ‘शेतकरी वाचवा’ अशी विनंती करण्यासाठी शेतकरी नेते किशोर तिवारी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तिवारी यांनी यावेळी केळापूर तालुक्यातील दहेली तांडा येथील आजारी उपासमारीला तोंड देत असलेले शेतकरी वासुदेव चव्हाण पांढरकवडा येथील स्टेट बँकने सरकारी मदत पिककर्जात कपात केल्याची तर राळेगाव तालुक्यातील माजी सरपंच सुदाम बल्की ह्यांनी फायनान्स कंपनीने गुंड लाऊन सरकारी अधिकाऱ्यांसोबत कर्जवसुली संपूर्ण यवतमाळ जिल्यात सुरु केल्याची माहिती दिली. तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या यावर्षी एकूण ३९४५३ गावांपैकी २४ हजार ८११ गावे म्हणजे जवळपास ६० टक्के गावांमध्ये पूर्ण खरीप पीक नष्ट झाल्यामुळे दुष्काळग्रस्त जाहीर असून यामुळे ९० लाख शेतकरी गंभीर दुष्काळाच्या प्रभावात असून जागतिक मंदीचा मार बसल्यामुळे नापिकीनंतर कापूस, तूर, सोयाबीन दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले असल्याची माहिती देत केंद्र सरकारने आपली सुमारे ५ हजार रुपये कोटींची मदत देणे तर सोडा यावर साधी चर्चा करीत नसल्याच्या आरोप तिवारी यांनी केला. (प्रतिनिधी)