४६ हजार हेक्टरवर संकट
By Admin | Updated: August 19, 2014 23:59 IST2014-08-19T23:59:25+5:302014-08-19T23:59:25+5:30
पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार

४६ हजार हेक्टरवर संकट
पावसाची दडी : केवळ ४० टक्के पाऊस, कपाशी, सोयाबीन करपतेय
वणी : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील ४६ हजार हेक्टरातील कपाशी, सोयाबीनचे पीक धोक्यात सापडले आहेत. ५४ हजार हेक्टर क्षेत्रात यावर्षी खरिपात पेरणी झाली. त्यापैकी जेमतेम आठ हजार हेक्टरातील पिके तूर्तास समाधानकारक असली, तरी पाऊस न आल्यास त्यांचीही स्थिती नाजूक होणार आहे.
मृग नक्षत्रापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा दणका दिला आहे. मध्यंतरी तुरळक पाऊस आल्याने शेती पिकांना जीवनदान भेटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवीत झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा गेल्या तीन हप्त्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. जुलै महिन्यातील पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलेलेले हास्य आता लोप पावत आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
अनेक शेतकऱ्यांवर दुबार-तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. पहिल्यांदा बियाणे पेरल्यानंतर मोड आल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. तशाही स्थितीत तालुक्यात यावर्षी ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली होती. सोबतच आठ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी सोयाबिनची पेरणी पूर्ण केली होती. तथापि पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवरवर दुबार-तिबार पेरणी करावी लागली होती. कपाशी सोबतच शेतकऱ्यांना २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली होती.
तालुक्यात खरीपात ४५ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. शेतकऱ्यांनी घरच्या लक्ष्मीच्या अंगावरील दाग-दागिने, शेती गहाण ठेवून कर्ज काढले. त्यानंतर कशीबशी दुबारच नव्हे, तर तिबार पेरणी केली. मात्र आता पावसाने पुन्हा त्यांना चिंताक्रांत केले आहे. गेल्या तीन हप्त्यांपासून पाऊस नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. आधी दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर शेतकऱ्यांना महागडे रासायनिक खत, महागडे किटकनाशक खरेदी करावे लागले. सोबतच निंदण, डवरणीचा खर्च करावा लागला. मजुरांना बाहेर गावावरून आॅटोने आणावे लागले. या सर्व त्रासापासून मुक्तता होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेती पिकांची जिवापाड जोपासना केली. मात्र आता पावसाने दडी मारल्याने शेतकरी पुरते हतबल झाले आहे. कर्ज कसे फेडावे, घरातील कार्य कशी करावी, प्रपंच कसा चालवालवा, या प्रश्नांनी त्यांना हैराण केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)