रेती कंत्राटदारांविरुध्द फौजदारी कारवाई
By Admin | Updated: May 15, 2015 02:22 IST2015-05-15T02:22:37+5:302015-05-15T02:22:37+5:30
जिल्हाधिकारी राहुलरंजन महीवाल यांनी स्वत: कारवाई केलेल्या हिवरादरणे व बऱ्हाणपूर येथील रेती ठेकेदारांविरुध्द गुरुवारी तहसील प्रशासनाच्यावतीने फौजदारी कारवाई करण्यात आली.

रेती कंत्राटदारांविरुध्द फौजदारी कारवाई
कळंब : जिल्हाधिकारी राहुलरंजन महीवाल यांनी स्वत: कारवाई केलेल्या हिवरादरणे व बऱ्हाणपूर येथील रेती ठेकेदारांविरुध्द गुरुवारी तहसील प्रशासनाच्यावतीने फौजदारी कारवाई करण्यात आली.
मंडळ अधिकारी विजय शिवणकर व संजय रोहणकर यांच्या फिर्यादीवरुन गैरअर्जदार चेतन डहाके व नितीन रघाटाटे (रा. दोन्ही पुलगाव, जिल्हा वर्धा) या दोन्ही रेती ठेकेदाराविरुध्द फौजदारी कारवाई करण्यात आली. या ठेकेदारांच्या सांगण्यावरुन तालुक्यातील बऱ्हाणपूर व परसोडी(खु.) येथे हर्रास ठिकाणाची हद्द सोडुन रेतीचे उत्खनन करण्यात आल्याचे आढळुन आले. तसेच हुस्रापूर घाट हर्रास झालेला नसतानाही त्याठिकाणावरुन रेतीचा उपसा करण्यात आला.
या रेतीघाटावरुन ४ लाख २९ हजार २९२ रुपयाची अवैधपणे रेतीचा उपसा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आतापर्यंत एक पोकलँड, दोन जेसीबी व १९ ट्रकविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली. जवळपास ५ लाखांचा दंडही वसुल करण्यात आली. आता तर थेट रेती कंत्राटदारावर अशाप्रकारे फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. कुण्या रेती कंत्राटदारावर अशाप्रकारची फौजदारी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तुर्तास तरी रेती माफीयाचे धाबे दणाणले आहे. तरीदेखील जिल्ह्यातील रेती तस्करी पूर्णपणे बंद झालेली नाही. उल्लेखनिय म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना स्वत: येऊन ही कारवाई करावी लागत आहे. त्यामुळे महसूलची इतर यंत्रणा व तालुकास्तरावरील यंत्रणा काय करते, हा प्रश्न जनमानसात विचारला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)