महसूल नेत्यांवर अपहाराचे गुन्हे
By Admin | Updated: June 11, 2015 02:18 IST2015-06-11T02:18:54+5:302015-06-11T02:18:54+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांविरोधात आर्थिक अपहार व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.

महसूल नेत्यांवर अपहाराचे गुन्हे
यवतमाळ : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांविरोधात आर्थिक अपहार व शासनाच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले. बुधवारी सायंकाळी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद करून या नेत्यांच्या अटकेसाठी पथक रवाना केले. या कारवाईमुळे महसूल वर्तुळात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.
महसूल कर्मचारी संघटनेचे नेते संघटना प्रमुख रवींद्र देशमुख, अध्यक्ष गजानन टाके, सरचिटणीस नंदकुमार बुटे, कोषाध्यक्ष अशोक कट्यारमल यांच्यावर अपहार, खासगी व्यक्ती व शासनाची फसवणूक करणे, न्यास भंग कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.
महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील प्रशासकीय भवनात असलेले उपहारगृह विनोद राठोड या खासगी व्यक्तीला चालविण्यास दिले. त्याची चौकशी करण्यात आल्यानंतर राठोड याच्या बयानानुसार महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत नौकरनामा केल्याचे सांगितले व करारापोटी ३० हजार रुपये अनामत व चार हजार रुपये प्रतिमहा भाडे संघटनेचे कोषाध्यक्ष अशोक कट्यारमल यांना दिल्याचे सांगितले. याशिवाय पुनर्वसन शाखेच्या जिन्याखाली असलेल्या झेरॉक्स सेंटर धारकाकडून महसूल कर्मचारी संघटनेने भाडे वसूल केल्याची बाब पुढे आली. त्याच्याकडून २००५-०६ पासून १५०० रुपये प्रतिमाह इतके भाडे घेतले जात होते.
या प्रकरणात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांच्या ४ जूनच्या आदेशावरून यवतमाळ तहसीलदार अनुप खांडे यांनी शहर ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलिसांनी चारही आरोपी तसेच या पूर्वी असलेले पदाधिकारी यांचा शोध घेणे सुरू केले आहे. नेत्यांवर फौजदारी कारवाई झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी )