मतमोजणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

By Admin | Updated: June 26, 2015 02:25 IST2015-06-26T02:25:27+5:302015-06-26T02:25:27+5:30

शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.२ मधील निवडणुकीत मतमोजणीत ईव्हीएमचे सील तोडून अफरातफर केल्याच्या ...

Crime against Counting Officers | मतमोजणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

मतमोजणी अधिकाऱ्यांवर गुन्हा

पुसद : शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्र.२ मधील निवडणुकीत मतमोजणीत ईव्हीएमचे सील तोडून अफरातफर केल्याच्या आरोपावरून दोन मतमोजणी अधिकाऱ्यांवर पुसद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी तहसीलदारांना तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते. एका उपअभियंत्यासह तलाठ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मतमोजणी पर्यवेक्षक तथा जिल्हा परिषद बांधकाम अभियंता सुनील नाईक आणि तलाठी श्रीराम बोडखे असे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, शहरालगतच्या श्रीरामपूर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २२ एप्रिल २०१५ रोजी पार पडली, तर २३ एप्रिल २०१५ रोजी सकाळी ११ वाजता येथील बचत भवनामध्ये मतमोजणी पार पडली. मात्र वॉर्ड क्र.२ मधील मतमोजणीच्या वेळी ईव्हीएमला सील नसून त्यातील मेमरी कार्ड काढण्यात आल्याची बाब मतदान प्रतिनिधींच्या लक्षात आली. त्यावेळी येथे उपस्थित असलेले मतदान प्रतिनिधी तथा उमेदवार संजय ढगे व मधुकर कलिंदर यांनी आक्षेप नोंदविला असता मतमोजणी पर्यवेक्षक तथा अभियंता सुनील नाईक व तलाठी श्रीराम बोडखे आदींनी आक्षेप फेटाळून लावत दुसरे मेमरी कार्ड ईव्हीएममध्ये टाकल्याचा आरोप आहे.
विशेष म्हणजे या सर्व प्रकरणाची तब्बल २२ मिनिटांची सीडी तयार करण्यात आली. यावर निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार यांनी वॉर्ड क्र.२ ची मतमोजणी स्थगीत केली. मात्र मतदान प्रतिनिधी कक्षाच्या बाहेर पडताच मतमोजणी सुरू करून निकालही जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे वॉर्ड क्र. २ मधून अनुसूचित जमातीचा सरपंच पदाचा उमेदवार होता, हे विशेष.
यावर पराभूत उमेदवार संजय ढगे यांनी आक्षेप नोंदवून वॉर्ड क्र.२ मधील मतमोजणीत अफरातफर झाल्याची लेखी तक्रार तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडे दाखल केली व त्याची एक प्रत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांना पाठविली. या संपूर्ण प्रकरणाची तब्बल २२ ते २४ मिनिटांची सिडीसुद्धा जिल्हाधिकारी व निवडणूक आयोबाकडे पाठविण्यात आली. या सिडीमध्ये ईव्हीएमला सिल नसून पहिली मेमरी काढून दुसरी मेमरी टाकण्यात आल्याचे स्पष्ट निदर्शनास येत आहे.
निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी आदींनी या सर्व बाबींचा अभ्यास करून मतमोजणी पर्यवेक्षक सुनील राऊत व सहाय्यक श्रीराम बोडखे हे दोषी आढळल्याने अखेर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी सचिंद्र प्रतासिंह यांनी तहसीलदार भगवान कांबळे यांना दिले. त्यावरून तहसीलदारांचे प्रतिनिधी कनिष्ठ लिपिक वसिम अहमद अब्दुल समद यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून या दोघांविरुद्ध भादंवि १२८, १३४, १३६ कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश हुरकुडे करीत आहे.
या प्रकरणी प्रस्तूत प्रतिनिधीने तहसीलदार भगवान कांबळे यांची भेट घेतली असता ग्रामपंचायत निवडणुकीतील वॉर्ड क्र.२ चे मतमोजणी पर्यवेक्षक सुनील नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा ई-मेल आला असल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against Counting Officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.