अपघातातील ‘त्या’ मृतांवर अंत्यसंस्कार
By Admin | Updated: June 2, 2015 00:22 IST2015-06-02T00:22:26+5:302015-06-02T00:22:26+5:30
लग्न समारंभावरून परतीच्या प्रवासात असताना काळाने घाला घातलेल्या सहा जणांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत ...

अपघातातील ‘त्या’ मृतांवर अंत्यसंस्कार
हजारोंची उपस्थिती : प्रत्येकजण हळहळला
घाटंजी : लग्न समारंभावरून परतीच्या प्रवासात असताना काळाने घाला घातलेल्या सहा जणांवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रत्येक जण हळहळताना दिसत होता. रविवारी बोलेरो पुलावर आदळून नुक्ती गावाजवळ अपघात झाला होता.
अपघातात जागीच ठार झालेल्या हकमुद्दीन काजी (५०) रा. घोटी, अमिनाबी कदीर अली (६५) रा. आर्णी आणि साबेरा युनुस शेख (४०) रा. घाटी यांच्यावर रविवारीच अंत्यसंस्कार करण्यात आले. तर उपचारादरम्यान मृत पावलेल्या नजमा शेख (८), जुबेदा बी अब्दूल शेख (६०) व युनुस शेख (५०) रा. घाटंजी यांच्यावर सोमवारी घाटंजीच्या कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. धार्मिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी प्रत्येकजण हळहळताना दिसत होते.
घाटंजी येथील शेख इरफान अब्दूल शेख यांच्या मुलाचा विवाह पांढरकवडा येथे रविवारी होता. विवाह समारंभ आटोपून ही मंडळी बोलेरोने घाटंजीकडे परत येत होती. नुक्ती गावाजवळ बोलेरोचा पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण गेले आणि बोलेरो पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळली. यात तीन जण जागीच ठार झाले. तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. घाटंजी येथे या तिघाचे मृतदेह आणल्यानंतर आप्तस्वकीयांनी एकच आक्रोश केला. परिसरातील शेकडो नागरिक जमले होते. या अपघाताने घाटी येथील राजीव गांधी चौक परिसरातील एकाही घरात चुल पेटली नाही. शेख कुटुंबियावर दु:खाचा डोंगरच कोसळला. (लोकमत चमू)
दाम्पत्य आणि वराची आजी ठार
नुक्ती गावाजवळ झालेल्या अपघातात युनुस शेख आणि त्यांची पत्नी साबेरा युनुस शेख हे दाम्पत्य या अपघातात ठार झाले. साबेरा बी यांचा जागीच मृत्यू झाला तर पती युनुस शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे दोघेही वराचे चुलत आजी-आजोबा होते. तर या अपघातात ठार झालेली जुबेदा बी अब्दूल शेख ही वराची आजी होती.