पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना

By सुरेंद्र राऊत | Published: July 13, 2022 04:32 PM2022-07-13T16:32:05+5:302022-07-13T16:48:41+5:30

जमशेटपूर येथील स्मशानभूमीतील दहनशेड तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितल्या जाते.

cremation shed collapses in Jamshetpur cemetery, body buried under rubble | पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना

पेटत्या चितेवर कोसळले दहनशेड, मृतदेह दबला मलब्याखाली; पुसद तालुक्यातील घटना

Next
ठळक मुद्देजमशेटपूर येथील स्मशानभूमीतील प्रकार

सुरेंद्र राऊत

पुसद (यवतमाळ) : ग्रामीण भागात स्मशानभूमीची अवस्था अतिशय बिकट आहे. स्मशानभूमीतील सिमेंटच्या शेडखाली चिता रचून प्रेतावर अंतिम संस्कार करण्यात येत होते. पूजाविधी आटोपून चिता पेटविण्यात आली. तोच काही मिनिटात दहनशेडचा स्लॅब व पिलर खाली कोसळले. या मलब्यात मृतदेह दबल्या गेला. ही थरारक घटना पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे घडली. 

मधुकर श्यामा आडे यांचे ११ जुलै रोजी निधन झाले. त्यानंतर १२ जुलैला सकाळी १० वाजता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वजण स्मशानभूमीत जमले. पावसाचे दिवस असल्याने दहनशेडखालीच चिता रचण्यात आली. चिता पेटविली असता काही मिनिटातच पूर्ण दहनशेड खाली कोसळले. यामुळे एकच खळबळ निर्माण झाली. शेडच्या मलब्यातून मृतदेह बाहेर काढावा लागला व पुन्हा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. 

जमशेटपूर येथील स्मशानभूमीतील दहनशेड तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे सांगितल्या जाते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हे शेड कोसळले. आता हे काम करणारा ठेकेदार व त्यावर नियंत्रण ठेवणारा अभियंता यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

तालुक्यातील दुसरी घटना

पुसद तालुक्यात यापूर्वी निंबी येथे स्मशानभूमीतील दहनशेड कोसळले होते. यातही सुदैवाने कोणी जखमी झाले नाही. त्यानंतर आता मंगळवारी जमशेटपूर येथे दहनशेड कोसळण्याची घटना घडली आहे.

Web Title: cremation shed collapses in Jamshetpur cemetery, body buried under rubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.