वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; वणीच्या कोलार पिंपरी शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2022 15:33 IST2022-11-29T15:31:56+5:302022-11-29T15:33:04+5:30
छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; परिसरात भीतीचे वातावरण

वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार; वणीच्या कोलार पिंपरी शिवारातील घटना
वणी (यवतमाळ) : वणी तालुक्यात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील कोलार पिंपरी शेतशिवारात एका गुराख्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
रामदास पिदूरकर (५०) असे मृत गुराख्याचे नाव आहे. रविवारी ते नेहमीप्रमाणे गुरांना चराईकरिता कोलार पिंपरी शिवारात घेऊन गेले; परंतु सायंकाळ होऊनही घरी परतले नाही. घरच्या मंडळींनी परिसरात शोधाशोध सुरू केली असता कुठेही आढळून आले नाही. अशातच सोमवारी पहाटे ग्रामस्थ व कुटुंबाने शोध सुरू केला असता रामदास पिदुरकर यांचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याबाबत पोलिस व वनविभागाला सूचित करण्यात आले.
सध्या तालुक्यात वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. पशुधनासोबतच शेतकरी- शेतमजुरांवर हल्ले होत आहेत. काही दिवसांपूर्वी ब्राह्मणी येथील युवकाला गंभीर जखमी केले होते. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.