ढाणकीला मिळणार ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:42 IST2021-04-16T04:42:39+5:302021-04-16T04:42:39+5:30
सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. त्याची ताकद प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली आहे. सोशल मीडियावर एखादे आवाहन केल्यानंतर त्याला ...

ढाणकीला मिळणार ऑक्सिजन सिलिंडर
सध्याचा काळ सोशल मीडियाचा आहे. त्याची ताकद प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली आहे. सोशल मीडियावर एखादे आवाहन केल्यानंतर त्याला प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. असाच एका बाबतीत अनुभव ढाणकीवासीयांना आला. सध्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन सिलिंडर नाही. ही बाब नागरिकांच्या लक्षात आली. एखाद्या गंभीर रुग्णाला जर ऑक्सिजनची गरज पडली, तर त्याला उमरखेड गाठण्याशिवाय पर्याय नाही. याबाबत सोशल मीडियावरील एका ग्रुपवर शहरातील संजय सल्लेवाड, ब्रम्हानंद मुनेश्वर यांनी चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
शहरातील दात्यांनी मदतीचा हात पुढे केला. रुग्णालयाला ऑक्सिजन सिलिंडर देण्याचा मानस व्यक्त केला. नंतर अक्षरशः अनेक नागरिकांनी आपापल्या परीने मदत देण्याचे ठरविले. यामुळे लवकर आता आरोग्य केंद्राला ऑक्सिजन सिलिंडर मिळण्याची आशा पल्लवित झाली. याबाबत लवकर एका सभेचे आयोजन करून पुढील नियोजन केले जाणार आहे. वास्तविक यात लोकप्रतिनिधी कुठे तरी कमी पडत आहेत. मात्र, तूर्तास सोशल मीडियाच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींनी ऑक्सिजन सिलिंडरसाठी मदतीचा हात पुढे केल्याने कोरोना काळात रुग्णांना दिलासा मिळणार आहे, एवढे निश्चित.