कुंटणखान्याचा तपास कॉल डिटेल्सवर
By Admin | Updated: July 25, 2014 00:03 IST2014-07-25T00:03:32+5:302014-07-25T00:03:32+5:30
दारव्हा रोडवरील कुंटणखान्यात सापडलेल्या महिला-मुलींच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सवर पोलिसांनी आपली तपासाची दिशा केंद्रीत केली आहे. या महिलांना गेल्या सहा महिन्यात कुणाकुणाचे कॉल आले,

कुंटणखान्याचा तपास कॉल डिटेल्सवर
दारव्हा रोडची धाड : मालकीण पोलीस कोठडीत तर तिघी सुधारगृहात
यवतमाळ : दारव्हा रोडवरील कुंटणखान्यात सापडलेल्या महिला-मुलींच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्सवर पोलिसांनी आपली तपासाची दिशा केंद्रीत केली आहे. या महिलांना गेल्या सहा महिन्यात कुणाकुणाचे कॉल आले, त्याचा तपास केला जाणार असून संबंधितांना बयानालाही बोलविले जाण्याची शक्यता आहे.
दारव्हा मार्गावरील भारती अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या एका कुंटणखान्याचा बुधवारी पोलिसांनी छडा लावला. तेथून कुंटणखान्याची मालकीण, दोन महिला व एका अल्पवयीन मुलीसह ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले होते. गुरुवारी या मालकीणीची पोलीस कोठडीत तर मुलींची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. या कुंटणखान्याचा पोलिसांनी विविध पैलूंनी तपास चालविला आहे. कुंटणखाना सुरू असलेला फ्लॅटचा मालक कोण, ताबा कुणाचा, केव्हापासून हा देहविक्रीचा व्यवसाय सुरू आहे, त्यांचे जिल्ह्यात आणखी कुठे नेटवर्क आहे, त्यांच्याकडे कोठून मुली-महिला तसेच ग्राहक येतात, त्यांच्या संपर्काची पद्धत, त्यासाठीचे क्रमांक, दलाल आदी मुद्यांवर तपास केंद्रीत केला गेला आहे. या महिला व मुलींकडील मोबाईल नंबर घेऊन तसेच मध्यस्थांचे नंबर मिळवून त्यांचे कॉल डिटेल्स काढले जात आहे. गेल्या काही महिन्यात या महिलांना आलेल्या फोन नंबरवर तपास चक्रे फिरविली जाणार आहे. या कुंटणखान्याला राजकीय वरदहस्त आहे का, कोण कोण राजकीय मंडळी या कुंटणखान्याच्या कव्हरेज क्षेत्रात होते, याचाही तपास पोलिसांकडून केला जाणार आहे.
आवश्यकता पडल्यास या कुंटणखान्याच्या संपर्कातील कॉल सापडल्यास संबंधिताला पोलीस ठाण्यात बयानासाठी बोलविण्याची तयारी केली जात आहे. या कुंटणखान्याच्या माध्यमातून यवतमाळ शहरातील असे अन्य ठिकाणे, व्यवसाय तसेच ग्रामीण मधीलही नेटवर्क शोधण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)