एसटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयाचा अवमान
By Admin | Updated: February 4, 2015 23:22 IST2015-02-04T23:22:53+5:302015-02-04T23:22:53+5:30
कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

एसटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयाचा अवमान
यवतमाळ : कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या कामगारांचे गेली तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
सुभाष राजाराम श्रीवास, अरुण नारायण सानप, विलास बबनराव परडखे, वासुदेव कवडूजी चांदेकर आणि आरती शंकरराव गवळी या यवतमाळ आगारातील वाहकांची बदली करण्यात आली. ही बदली नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांनी विभाग नियंत्रकांकडे निवेदन, प्रसंगी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र बदली रद्द करण्यात आली नाही. यामुळे त्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला.
न्यायालयाच्या आदेशावरून सदर कामगार रुजू होण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र त्यांना विविध कारणे सांगत रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे या कामगारांनी अवमान याचिका दाखल केली. यानंतरही त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. गेली तीन महिन्यांपासून या कामगारांचे वेतन झालेले नाही. हा प्रकार जाणिवपूर्वक त्रास देण्याचा असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वपदावर रुजू करून घेत गेली तीन महिन्यांचे वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)