शेतकऱ्यांसाठी समुपदेशन कक्ष
By Admin | Updated: November 27, 2015 02:45 IST2015-11-27T02:45:10+5:302015-11-27T02:45:10+5:30
राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी समुपदेशन कक्ष
पहिला टप्पा : प्रेरणा प्रकल्प-शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रम
यवतमाळ : राज्यात नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्याप्रवण जिल्ह्यांमध्ये विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये यवतमाळ, अकोला, नांदेड, औरंगाबाद व लातूर या पाच जिल्ह्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालयात तर अमरावती, बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशीम व वर्धा या नऊ जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्णालयात विशेष समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात विशेष समुपदेशन केंद्रासह, आशा कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत मार्गदर्शन तसेच कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या आदींचा समावेश आहे.
आकस्मिकता निधीतील अग्रीमामधून ही योजना राबविण्यात येत असून या प्रकल्पास ‘प्रेरणा प्रकल्प-शेतकरी समुपदेशन आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ७.६५६६ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यामध्ये कंत्राटी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. समुपदेशन तज्ञ, चिकित्सालयीन समुपदेशन तज्ञ, समुपदेशन सामाजिक कार्यकर्ता, परिचारीका, लेखापाल आदी पदांची निर्मिती करण्यात येणार आहे. सोबतच समुपदेशन कक्षातील पायाभूत सुविधा, वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, वाहन, १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचे सर्वेक्षण, आजाराचे वर्गीकरण, आशा कार्यकर्ती, गट प्रवर्तक यांना मानसिक आरोग्य व राजीव गांधी जिवनदायी आरोग्य योजनेचे प्रशिक्षण आदींसह इतरही उपक्रम राबविले जाणार आहेत. थेट सबंधित जिल्ह्यात समुपदेशन केंद्र सुरू होत असल्यामुळे याचा लाभ निश्चितच होणार आहे.
शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध होऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण केल्यास शेतकरी आत्महत्या थांबतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. (प्रतिनिधी)