कापूस व्यापाऱ्याचा गळा आवळून खून
By Admin | Updated: December 28, 2016 00:12 IST2016-12-28T00:12:20+5:302016-12-28T00:12:20+5:30
कापूस व सोयाबीन व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.

कापूस व्यापाऱ्याचा गळा आवळून खून
पैशाचे कारण ? : ८० हजारांची रोकड गायब
रुंझा : कापूस व सोयाबीन व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. काशीनाथ मुकिंदा डंभारे (५०) रा. मोरवा (ता.पांढरकवडा) असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. सायखेडा शिवारातील देमापुरे यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
सदर व्यापारी दररोज मोरवा ते सायखेडा या पायवाटेने पायदळ ये-जा करीत होते. आज बराच उशीर होवूनही सायखेडा येथे पोहोचले नाही. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांच्या घरी संपर्क करण्यात आला. त्यावेळी काशीनाथ हे सकाळी ९ वाजताच घरून गेल्याचे सांगण्यात आले. शोधाशोध सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृतदेह देमापुरे यांच्या शेतात आढळून आला. त्यांच्या गळा सुजला होता. छातीवरील रक्त गोठलेले होते, तर पँटही फाटलेला होता. यावरून त्यांचा खूनच झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले.
घटनेची माहिती मिळताच पांढरकवडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव जाधव, ठाणेदार गुलाबराव वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदुरकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप मांजरमे, शिपाई किनाके, पोलीस पाटील पडोळे आदी घटनास्थळी दाखल झाले होते. सदर व्यापारी घरून ८० हजार रुपये घेऊन निघाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या पैशांसाठी तर खून झाला नसावा यादृष्टीनेही तपास केला जात आहे. (वार्ताहर)